Manipur Violence : विरोधी पक्षांचे २० खासदार मणिपुरच्या दौऱ्यावर; हिंसाचारग्रस्त भागांची करणार पाहणी
Manipur Violence News : मणिपुरची राजधानी इंफाळमध्ये शांतता पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यात दोन्ही समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
Manipur Violence News : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपुरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. कुकी आणि मैतैई समाजातील गट एकमेकांच्या घरांवर तसेच परिसरात हल्ले करत आहे. त्यातच ७०० ते ८०० लोकांच्या जमावाकडून तीन महिलांची विवस्त्र धिंड काढत बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं देशभरात संताप व्यक्त केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानंतर आता विरोधकांच्या इंडिया या आघाडीचे तब्बल २० खासदार मणिपूर राज्याचा आजपासून दोनदिवसीय दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाचा एक खासदार मणिपुरच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मणिपुरच्या हिंसाचारावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी संसदेत चांगलाच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मणिपुरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधकांच्या २० खासदारांचं शिष्टमंडळ आज इंफाळसाठी रवाना होणार आहे. विरोधी खासदार हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करणार असून तेथील नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. इंफाळमध्ये कोकोमी ग्रुपकडून शांतता रॅली काढली जाणार आहे. या रॅलीतही विरोधी खासदार सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता विरोधकांच्या या खेळीमुळं सत्ताधारी मोदी सरकारची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपुरमधील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केलं होतं. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मणिपुरमध्ये तीन महिलांवर बलात्कार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी पीएम मोदी यांनी मणिपुरमधील घटनांवर संसदेत निवेदन देण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर कॉंग्रेस खासदारांनी संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळं आता या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावं लागणार आहे. परिणामी येत्या काही दिवसांत मणिपुरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून संसदेत राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.