Online Passport Portal Shut For 5 Days : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील पाच दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. या काळात नव्या अपॉइमेंट्स दिल्या जाणार नसून तसेच आधी देण्यात आलेल्या अपाइमेंट्स या रद्द केल्या जाणार आहे. तसेच त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत.
पासपोर्ट सेवा पोर्टल तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी २९ ऑगस्ट पासून २ सप्टेंबर रोजी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांसाठी आणि सर्व एमईए, आरपीओ, बीओआय, आयएसपी, डीओपी व पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रणाली उपलब्ध राहणार नाही. ३० ऑगस्ट रोजी बुक केलेल्या अपॉइंटमेंटचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. त्यांना नव्या तारखा दिल्या जाणार आहेत. या बाबत अर्जदारांना सूचित केले जाईल, असे पासपोर्ट सेवा पोर्टलने म्हटले आहे.
ही नियमित चालणारी प्रक्रिया असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “अपॉइंटमेंट्सच्या तारखा बदलण्यासाठी आम्ही आधीच योजना आखून ठेवलेली असते. नागरी सेवासंदर्भातील सेवा खंडित करण्याआधी पूर्वनियोजन केलं जातं. त्यामुळे अपॉइंटमेंट्स रिशेड्युल करणं फारसं आव्हानात्मक नसेल”, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.
पासपोर्ट सेवा पोर्टलचा वापर लोक नवीन पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी देशभरातील नामांकित केंद्रांवर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी करतात. फेरतपासणीसाठी अर्जदारांनी त्यांच्या भेटीच्या दिवशीच पासपोर्ट केंद्रांवर पोहोचणे आवश्यक असते. यानंतर पोलिस व्हेरिफिकेशनचा केले जाते. त्यानंतर पासपोर्ट अर्जदाराच्या पत्त्यावर पोहोचतो. साधारण ३०-४५ दिवसांत पासपोर्ट अर्जदारापर्यंत पोहोचवला जातो. तत्काळ सेवेमध्ये काही दिवसांत हा पासपोर्ट पोहोचतो.
मार्च महिन्यात देखील पासपोर्ट संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे अर्जदारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय झाली होती.
शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचे स्थान हे ८२व्या क्रमांकावर आहे. भारतातीय पासपोर्टच्या आधारे ५८ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. २०१८ पासून भारतीय पासपोर्ट हे हेन्ली पारपत्र निर्देशांक क्रमांक ८० ते ८७ मध्ये स्थिरावला आहे.
संबंधित बातम्या