गेल्या अनेक वर्षापासून देशभर चर्चेत असलेल्या 'एक देश, एक निवडणूक' धोरणाला केंद्र सरकारकडून मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय सरकारने'एक देश, एक निवडणूक' (One Nation one Election) या धोरणाला आज मंजुरी दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली'एक देश, एक निवडणूक' धोरणाच्या अभ्यासासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने'एक देश, एक निवडणूक' धोरणाबाबत सर्वांगीण अध्ययन करून आपले अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सरकारला सादर केला होता. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याने देशात आता एक देश एक निवडणूक धोरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेऊन देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने 'एक देश, एक निवडणूक' उपक्रमाचा अहवाल सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या या अहवालात एकाच वेळी निवडणुकांच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष आराखडा मांडण्यात आला आहे. या समितीने पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती आणि त्यानंतर १०० दिवसांच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित करण्याची शिफारस केली होती.
एक देश एक निवडणुकीमुळे विविध पातळ्यांवर अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांची वारंवारता कमी होईल तसेच वारंवार होणाऱ्या निवडणुकांचा आर्थिक आणि प्रशासकीय बोजा कमी करण्लयाचा उद्देश्य या प्रस्तावाचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'एक देश, एक निवडणूक' या उपक्रमाचे पुरस्कर्ते आहेत. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मोदींनी वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत असल्याने तो थांबवण्याचे आवाहन केले होते.
निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागते, ज्यामध्ये कुठल्याही नव्या घोषणा करता येत नाहीत. यामुळे विकासास खीळ बसते, असं केंद्र सरकारचं मत आहे. तसं होऊ नये म्हणून एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मांडला गेला. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत. कोणत्याही योजनेचा किंवा उपक्रमाचा निवडणुकीशी संबंध जोडणे सोपे झाले आहे. दर तीन ते सहा महिन्यांनी कुठे ना कुठे निवडणुका असतात. प्रत्येक काम निवडणुकीशी निगडित असते,' असे मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी अकराव्यांदा ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सांगितले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीरनाम्यात या धोरणाची प्रमुख वचनबद्धता म्हणून उल्लेख केला होता. या प्रस्तावाला भाजपमधील अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी इतर राजकीय पक्ष काय प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या समितीने तब्बल १८ घटनादुरुस्तीची शिफारस केली असून, त्यातील बहुतांश सुधारणांना राज्यांच्या विधानसभांच्या मंजुरीची गरज भासणार नाही. तथापि, यासाठी काही घटनादुरुस्ती विधेयके आवश्यक आहेत जी संसदेने मंजूर करणे आवश्यक आहे. एकच मतदार यादी आणि एकल मतदार ओळखपत्रासंदर्भातील काही प्रस्तावित बदलांना किमान निम्म्या राज्यांची मान्यता आवश्यक आहे.
लॉ कमिशन ऑफ इंडिया लवकरच या विषयावर आपला अहवाल जाहीर करण्याची शक्यता आहे.