उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील गुमनावरा येथे एका फायनान्स कंपनीच्या ३४ वर्षीय एरिया मॅनेजरने गळफास घेत आत्महत्या केली. टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर दबाव होता. वसुलीचे टार्गेट पूर्ण न केल्यास त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी सातत्याने दिली जात होती. रविवारी सुट्टी असूनही त्याची ऑनलाइन बैठक घेऊन बॉसने त्याला वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत इशारा दिला होता. बॉसच्या धमकीला कंटाळून एरिया मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत व्यक्तीजवळ पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे.
नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराणा प्रताप नगर गुमनावरा येथे राहणाऱ्या कृष्णबिहारी सक्सेना यांचा मुलगा तरुण सक्सेना एका खासगी फायनान्स कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत होता. जिल्हा व परिसरातील कर्ज वसुलीची जबाबदारी तरुण सक्सेना याच्यावर होती. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी ईएमआय जमा केला नाही. ही परिस्थिती माहिती असूनही कंपनी तरुणला टार्गेट पूर्ण करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होती. तरुण तळबेहाट आणि मोंठ गावात राहून कर्ज वसुलीचे काम करीत होता.
दुसरीकडे टार्गेट पूर्ण न झाल्याने कंपनीकडून सातत्याने त्याचा अपमान केला जात होता. आता कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती. यामुळे तरुण निराश व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. शनिवारी रात्री त्याने जेवणही केले नाही. सकाळी उठून तरुण घरच्यांशी बोलून खोलीत गेला. काही वेळाने कुटुंबीय खोलीत पोहोचले असता तरुणचा मृतदेह दोरीला लटकलेला अवस्थेत दिसला. कुटूंबीयांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाजवळील सुसाईड नोट जप्त केली. त्यात उद्दिष्ट पूर्ण न केल्याने कंपनीकडून झालेल्या अपमानाबद्दल लिहिण्यात आले होते. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, मृताचे शवविच्छेदन केले जात आहे. मृत व्यक्तीकडून पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.
स्वत:शीच लग्न करून व्हायरल झालेली तुर्की टिकटॉक स्टार कुब्रा अयकुत हिचे वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. इस्तंबूलमधील सुलतानबेली येथील एका आलिशान अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तिने जीवन संपवलं. तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, ज्यामुळे तिने आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नााही.