Odisha Biggest Income Tax Raid In India: देशात अनेक मोठे इनकम टॅक्स छापे पडले आहेत, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या छाप्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? तब्बल १० दिवस अधिकारी कारवाई करत होते. तर मशीनच्या साह्याने पैसे मोजून अधिकारी देखील थकले होते. या छाप्यात नेमकी किती रक्कम जप्त झाली याचा अंदाज देखील लावता येणार नाही. या सर्वात मोठ्या आयकर छाप्याची संपूर्ण माहिती घेऊयात.
भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला आहे. तब्बल १० दिवस ही कारवाई चालली. धक्कादायक म्हणजे जमिनी खाली पैसे लपवण्यात आले होते. हे पैसे शोधण्यासाठी विशेष यंत्राचा वापर करण्यात आला.
देशातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशा राज्यात टाकण्यात आला. येथे आयकर अधिकाऱ्यांनी बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य निर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकले होते. १० दिवस चाललेल्या या छाप्यात २५२ कोटी रुपये जप्त करण्यात आले. या छाप्याच्या गांभीर्याचा अंदाज यावरून लावता येतो की, आयकर विभागाने छापेमारीच्या वेळी स्कॅनिंग व्हील असलेले मशीन लावले होते, जेणेकरून जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध घेता येईल. आयकर विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली होती.
प्राप्तिकर विभागाने या नोटा मोजण्यासाठी ३६ मशिन मागवल्या होत्या. कंपनीत जमिनी खाली ट्रक भरून मोठी रोकड आढळून आली. ही रक्कम मोजण्यासाठी विविध बँकांतील कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. छाप्यादरम्यान नोटा आणि अधिकाऱ्यांची जमवाजमव करणे आणि नोटा मोजण्याचे काम करण्याचे दृश्य एखाद्या चित्रपटाला शोभेल असे होते. मात्र, हा चित्रपट नसून पूर्णपणे खरीखुरी आयकर विभागाची कारवाई होती. या छाप्यात जप्त केलेली रक्कम एका ट्रकमध्ये भरून कडेकोट बंदोबस्तात आयकर विभागाकडे जमा करण्यात आली.
या वर्षी ऑगस्टमध्ये ओडिशात आयकर छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा केंद्र सरकारने गौरव केला होता. आयकर विभागाच्या या कारवाईचे नेतृत्व आयकर तपास अधिकारी एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंग यांनी केले. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक बनला नाही तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले.
संबंधित बातम्या