तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबीची भेसळ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जगन्नाथ मंदिरात (jagannath temple) प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचा दर्जा तपासण्याचा निर्णय ओडिशा सरकारने मंगळवारी घेतला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरात लाडू बनवण्यासाठी जनावरांची चरबी असलेले तूप वापरल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन यांनी सांगितले की, येथे असा कोणताही आरोप झाला नसला तरी प्रशासन कोठा भोग (देवसाठी प्रसाद) आणि बरारी भोग (ऑर्डरवरून प्रसाद) तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करेल.
ओडिशा मिल्क फेडरेशन (ओएमफेड) ही पुरी मंदिरासाठी तूपाचा एकमेव पुरवठादार आहे. मात्र, भेसळीची भीती कमी करण्यासाठी ओएमफेडकडून पुरविण्यात येणाऱ्या तुपाचा दर्जा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात प्रसाद तयार करणाऱ्या सेवकांशीही चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सेवक जगन्नाथ स्वैन मोहपात्रा यांनी सांगितले की, पूर्वी मंदिर परिसरात दिवे जाळण्यासाठी भेसळयुक्त तुपाचा वापर केला जात होता. पण आता दिवे लावण्यासाठी सुद्धा शुद्ध तुपाचाच वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले. तुपाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती मंदिराच्या मुख्य प्रशासकांना करणार आहोत.
तिरुपती मंदिरात ज्या तुपापासून लाडू बनवले जातात, त्या तुपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी वायएसआरसीपी सरकारच्या काळात लाडू बनवताना निकृष्ट दर्जाचे घटक आणि जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा दावा केल्यानंतर हा वाद अधिक चव्हाट्यावर आला.
तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर यावरून वाद उफाळला आहे. खास पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या या लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याचा प्रयोगशाळेचा अहवालही समोर आला आहे. मात्र या वादानंतरही लाडूच्या विक्रीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज ६० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात तिरुपतीचे १४ लाख लाडू विकले गेले आहेत.