मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गांजा असेल म्हणून केली तपासणी, सांगलीच्या व्यापाऱ्याकडे पोलिसांना सापडली १.२२ कोटींची रक्कम

गांजा असेल म्हणून केली तपासणी, सांगलीच्या व्यापाऱ्याकडे पोलिसांना सापडली १.२२ कोटींची रक्कम

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 11, 2022 06:44 PM IST

Cash and Gold Seiz: पोलिसांकडून गांजा तस्करी प्रकरणी तपास केला जात असताना एका व्यापाऱ्याजवळ १.२२ कोटींची रोकड आणि २० सोन्याची बिस्किटे आढळून आली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो (फोटो - एएनआय)

Cash and Gold Seiz: गांजा तस्करीप्रकरणी पोलिसांकडून बसची तपासणी करताना सांगलीच्या एका व्यावसायिकाकडे मोठे घबाड सापडले आहे. जवळपास १.२२ कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याची २० बिस्किटे पोलिसांनी जप्त केली. ओडिशातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओडिशातील बेहरामपूर पोलिसांना बसमधून गांजा तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाकाबंदी केली होती. यावेळी गाड्यांची तपासणी करत असताना दशरथ सावकार नावाच्या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील हा व्यापारी असल्याचे समजते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यापारी हा बेहरामपूरच्या आनंद ज्वेलर्स इथं सोने देण्यासाठी येत होता. तेव्हा पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. व्यापाऱ्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच व्यापाऱ्याकडे सापडलेली रोख रक्कम ही ५०० रुपयांच्या नोटांची आहे. आता याप्रकरणाची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला दिली आहे. पैशांची चौकशी प्राप्तिकर विभाग करणार आहे.

प्राप्तिकर विभाग आता व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम हवालासाठी वापरली जात होती का याचा तपास करणार आहे. रोख रकमेशिवाय व्यापाऱ्याकडे सोन्याची २० बिस्किटेसुद्धा आढळली आहेत. या बिस्किटांचे वजन अडीच किलो इतकं आहे. हे सोने तस्करीच्या माध्यमातून मिळवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या व्यापाऱ्याचे सांगली कनेक्शन तपासले जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग