Delhi Crime : ऑनलाइन मैत्रीचे जाळे तयार करून शेकडो महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका सायबर भामट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी बनावट प्रोफाइल तयार करून स्वत:ला अमेरिकन मॉडेल म्हणून भासवत स्वत:ची ओळख लपवण्यासाठी व्हर्च्युअल इंटरनॅशनल मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक करत होता. त्याकह्या जाळ्यात देशभरातील तब्बल ७०० पेक्षा जास्त तरुणी फसल्या आहेत. या मुलींचे न्यूड व्हिडिओ त्याच्या मोबाइलमध्ये सापडले आहे. या फोटोच्या माध्यमातून हा तरुणींना ब्लॅकमेल करत होता.
आरोपी हा अमेरिकेचा मॉडेल असल्याचे भासवून तरुणी आणि महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. दिल्लीतील सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शकरपूर परिसरातून या आरोपीला अटक करण्यातआली आहे. तुषार बिष्ट असे या आरोपीचे नाव आहे. तुषार हा आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल मोबाइल नंबर आणि बनावट आयडीचा वापर करून बंबल, स्नॅपचॅट आणि इतर अॅप्सवर फेक प्रोफाइल तयार केले. त्याच्या मोबाइलमधून ७०० हून अधिक मुलींचे न्यूड फोटो व व्हिडिओ सापडले आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक तरुणी तक्रार करण्यासाठी पुढे आल्या आहेत. आरोपीकडून कडून एक मोबाइल फोन, अॅप बेस्ड व्हर्च्युअल इंटरनॅशनल मोबाइल नंबर आणि १३ क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त विचित्रा वीर यांनी सांगितले की, दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने १३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.
पीडितेने सांगितले की, जानेवारी २०२४ मध्ये तिची ऑनलाइन डेटिंग अॅप बंबलवर एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने स्वत:ला अमेरिकेतील फ्रीलान्सर मॉडेल असल्याचे सांगितले. आरोपीने सांगितले की, तो वैयक्तिक कामानिमित्त भारतात आला होता. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. पीडितेने स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपींसोबतचे आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. पीडितेने आरोपीला अनेकदा भेटण्यास सांगितले, परंतु त्याने प्रत्येक वेळी बहाण्याने नकार दिला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीला व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. दबावाखाली विद्यार्थ्याने थोडी रक्कम दिली, पण आरोपींची मागणी वाढली. त्यामुळे वैतागलेल्या मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
५०० पेक्षा जास्त मुलींशी चॅटिंग व ७०० मुलींचे न्यूड फोटो
पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, आरोपींकडे सापडलेल्या फोनची व इतर वस्तुतपासल्या असता तुषार हा ५०० हून अधिक मुलींशी चॅटिंग करत होता. तर त्याच्या फोनमध्ये ७०० हून अधिक तरुणींचे अश्लील व न्यूड फोटो व व्हिडिओ सापडले आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपींकडून दिल्ली एनसीआरमधील ६० महिलांचे नंबर देखील आढळले आहेत.
चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने दोन वर्षांपूर्वी अॅपच्या माध्यमातून व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक मिळवला. हा नंबर मिळाल्यानंतर त्याने बंबल, स्नॅपचॅटसह अनेक चॅटिंग अॅप्लिकेशनवर स्वत:ची नोंदणी केली. त्याच्या प्रोफाईलवर त्याने स्वत:ला अमेरिकन मॉडेल म्हणून भासवले. या साठी त्याने ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरला.
एसीपी (ऑपरेशन्स) अरविंद कुमार आणि इन्स्पेक्टर धर्मेंद्र यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीच्या बँक खात्याची माहिती गोळा केली. खात्याशी संबंधित मोबाइल क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर शकरपूर येथील घरावर छापा टाकून आरोपी तुषार बिष्ट (वय २३) याला अटक करण्यात आली.
आरोपीने सांगितले की तो वडील, आई आणि बहिणी सोबत राहत असून त्याचे वडील खासगी कार चालक आहे. तर आई गृहिणी आहे. त्याची बहीण गुरुग्राममध्ये काम करते. आरोपीने बीबीए पूर्ण केल्यानंतर तीन वर्षांपासून नोएडाच्या एका खासगी कंपनीत तो काम करत आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी तो तरुणींना फसवत असे.
संबंधित बातम्या