मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NSE घोटाळा प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई, १० ठिकाणांवर छापे

NSE घोटाळा प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई, १० ठिकाणांवर छापे

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 02:37 PM IST

सीबीआयने दिल्ली, मुंबई, नोएडा आणि गुरुग्रामसह देशातील १० ठिकाणांवर छापे टाकला आहे.

चित्रा रामकृष्ण
चित्रा रामकृष्ण (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणी छापे टाकले आहेत. सीबीआयने दिल्ली, मुंबई, नोएडा आणि गुरुग्रामसह देशातील १० ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती असून यात ब्रोकर्सच्या ठिकाणांचा समावेश आहे. एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचे नाव मुख्य आरोपींपैकी एक आहे. या आठवड्यात दिल्लीतील न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता.

स्टॉक एक्सचेंजमध्ये अनियमितता असल्यावरून २०१८ मध्ये एक एफआयआर दाखल कऱण्यात आली होती. हिमालयीन योगी या मेलवर केलेल्या संवादाचा हवाला सेबीने एका रिपोर्टमध्ये दिला होता. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी हिमालयीन योगी या मेलवर शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली असल्याचा आरोप सेबीने केला होता.

एनएसईचे माजी अधिकारी आनंद सुब्रमण्यम हेसुद्धा आरोपी आहेत. रामकृष्ण यांना ६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तर सुब्रमण्यम यांना फेब्रुवारीत अटक केली होती. सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीतील OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि संचालक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्या बेकायदेशीरपणे मिळवून त्यातून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. सेबीने NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश याआधी दिले आहेत.

WhatsApp channel