tirupati balaji laddu issue : तिरूपती बालाजी येथील लाडूचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपती बाजली येथे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूत प्राण्याची चरबी आणि भेसळ युक्त तूप वापरले असल्याचा दावा केला होता. दरम्यान, यानंतर आता आणखी एका महिला भविकेने तिरूपती बालाजी येथील लाडूच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
या भविकेने प्रसादाच्या लाडूत तंबाखूची पुडी सापडल्याचा दावा केला आहे. याचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. ही महिला भाविक आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे. ती काही दिवसांपूर्वी व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने प्रसाद म्हणून आणलेल्या या लाडूमध्ये कागदात गुंडाळलेला तंबाखू सापडला.
तिरुपती येथील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिरात तिला प्रसाद (धार्मिक प्रसाद) म्हणून देण्यात आलेल्या लाडूमध्ये कागदात गुंडाळलेला तंबाखू सापडल्याचा आरोप तिने केला आहे. लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशात मोठी राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
खम्मम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या डोन्थू पद्मावती यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी त्या तिरुपती मंदिरात गेल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या लाडूमध्ये त्यांना तंबाखू गुंडाळलेला कागद सापडला. इतर भक्तांप्रमाणेच पद्मावती यांनीही त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि शेजाऱ्यांना देण्यासाठी प्रसादाचा लाडू वाटण्यासाठी आणला होता.
या बाबत पद्मावती म्हणाल्या, मी लाडूचे वाटप करत असतांना लाडू मध्ये काही तरी असल्याचं मला आढळलं. मी निरखून पाहिले असता, त्यात एका छोट्या कागदात गुंडाळेला तंबाखू आढळला. यामुळे मोठा धक्का बसला. तिरूपति येथील प्रसादम लाडू पवित्र मानला जातो. या प्रसादात जर तंबाखू निघत असेल तर ही हृदयद्रावक आहे, असे पद्मावती म्हणाल्या.
लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या बाबत आरोप केला होता. दरम्यान, प्रयोग शाळेच्या अहवालात देखील हे सत्य असल्याचं आढळल्याने लाखो तिरुपती भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. येथे दररोज येणारे लाखो भाविक हा लाडू प्रसाद म्हणूंन खात असतात. शिवाय हा प्रसाद नातेवाईकांना वाटण्यासाठी म्हणून हा लाडू घेऊन येतात. या लाडूत होत असणारी भेसळ उघड झाल्यामुळे देशभरातील भाविकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामूळे तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD), मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या ट्रस्टच्या गुणवत्ता नियंत्रनाबद्दल आता शंका उपस्थित केली जात आहे.
मागील जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीसह निकृष्ट घटक सापडल्याचा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला. गुजरातमधील एका खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालाचा संदर्भ देत, नायडू यांनी तुपात प्राण्यांच्या चरबीचे तेल आणि माशाचे तेल असल्याचा आरोप केला. मात्र, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या हे दावे निराधार असल्याचं म्हटलं आहे. नायडू यांनी देवाच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.