आता प्रभू रामाची नगरी अयोध्या शहराचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई दर्शन करता येणार आहे. रामनवमीच्या निमित्त भाविकांना अयोध्या शहराचे हवाई दर्शन करण्यासाठी आजपासून हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान हेलिकॉप्टर उशिराने पोहोचल्याने याचे पहिले उड्डाण बुधवारी सकाळी ९ वाजता होईल. सात सीटर हे हेलिकॉप्टर रामकथा पार्क जवळ बनवण्यात आलेल्या हेलीपॅडवर दाखल झाले आहे. यामध्ये दोन क्रू मेंबर आहेत. या हवाई दर्शनासाठी प्रति व्यक्ति तीन हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास निगम लिमिटेड तसेच हेरिटेज एव्हिएशन यांच्याकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावार सुरू करण्यात आली असून त्यानंतर याचा विस्तार केला जाईल.
या हवाई दर्शनासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सरयू गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक रविकांत यांना प्रमुख पदी नेमले आहे. त्यांनी सांगितले की, या हवाई दर्शनासाठी तिकीट बुकिंग ऑफलाइन पद्धतीने याच अतिथी गृहात केले जात आहे. या हवाई दर्शनासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद असून चौकशीसाठी अनेक फोन येत आहेत.
दोन वर्षाहून लहान मुलांना सोबत नेण्याची परवानगी नाही -
हे हवाई दर्शन दररोज सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. या दर्शनासाठी दोन वर्षाहून कमी वर्षाच्या मुलांना सोबत नेण्यास परवानगी नाही. त्याचबरोबर दोन वर्षाच्या मुलापासून सर्व वयोगटातील लोकांना एकच भाडे द्यावे लागेल. यामध्ये कोणतीही सवलत नाही.
सांगितले जात आहे की, हे हवाई दर्शन सात ते आठ मिनिटांसाठी असेल. या दरम्यान हेलिकॉप्टर संपूर्ण अयोध्या धामला प्रदक्षिणा घालेल. सात प्रवासी असल्यानंतरच हेलिकॉप्टर उड्डाण करेल. सध्या ही सेवा १५ दिवसांसाठी आहे. प्रतिसाद पाहून याचा विस्तार केला जाईल.