काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिसत की, ते दिल्लीतील एका हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी ट्रीम करून घेत आहेत. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, सलून चालकाचे ‘काहीच उरत नाही’ हे शब्द देशातील मेहनत करणाऱ्या गरिबाची आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी व्यक्त करतात.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्थानिक सलून दुकानाला भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काँग्रेस नेत्याने आपल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे. ते लिहितात, 'आज भारतातील प्रत्येक कष्टकरी, गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाची ही कहाणी आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल खुर्चीवर बसलेले दिसत आहेत तर अजित नावाचा न्हावी त्यांची दाढी ट्रीम करतना आपली कहाणी सांगताना दिसत आहे. अजित राहुलला सांगतात की तो दिवसभर मेहनत करतो, पण शेवटी त्याच्याकडे काहीच उरत नाही. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, "काहीही शिल्लक राहत नाही. अजित भाईंचे हे चार शब्द आणि त्यांचे अश्रू आज भारतातील प्रत्येक कष्टकरी गरीब आणि मध्यमवर्गाची कहाणी सांगत आहेत. न्हावीपासून मोचीपर्यंत, कुंभारांपासून सुतारपर्यंत - घटते उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे हाताने काम करणाऱ्यांकडून त्यांची दुकाने, त्यांची घरे आणि स्वाभिमान हिरावून घेतला आहे.
राहुल गांधी पुढे लिहितात, "आज गरज आहे ती आधुनिक उपाययोजना आणि नवीन योजनांची ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि कुटुंबांमध्ये बचत परत येईल. आणि, असा समाज जिथे प्रतिभेला योग्य प्रकारे सक्षम केले जाते आणि कठोर परिश्रमाचे प्रत्येक पाऊल आपल्याला प्रगतीच्या शिडीवर घेऊन जाते. राहुल गांधी यांनी सलूनवाल्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधलेला आहे.
राहुल गांधी यांनी आज ज्या सलून दुकानाला भेट दिली ते सलून अजित नावाच्या व्यक्तीकडून चालवले जाते. या भेटीनंनतर अजित यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना भेटून आपल्याला आनंद वाटला. मला राहुल गांधी यांच्याशी बोलून खूप चांगले वाटले. गरिबांना सहारा देणारा कोणीतरी असल्याचे वाटले.
अजित यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा राज्यात सुख होते. भविष्य चांगले असल्याचे वाटत होते. मात्र सगळे तिथल्या तिथेच राहिले. मी दिव्यांग आहे. मुलांचे भविष्य अंधकारमय आहे.
राहुल गांधी यांनी हमाल, चांभार, न्हावी सह स्थानिक मजुरांशी संवाद साधला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका सलून दुकानात केस कापण्यासाठी आणि दाढी ट्रीम करण्यासाठी गेले होते. त्या व्हिडिओमध्ये ते सलून चालकाला त्याच्या कामाच्या तासांबद्दल आणि हे कौशल्य कसे शिकायचे याबद्दल विचारत असल्याचे ऐकू येते. नंतर राहुल गांधींनीही त्या सलून चालकाच्या दुकानासाठी भरपूर सामान पाठवले होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मे महिन्यात उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका न्हाव्याच्या दुकानाला भेट दिल्यानंतर दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
राहून गांधी यांनी याआधीही चांभार, बांधकाम मजूर, मेकॅनिक, ट्रक ड्रायव्हर आदींशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायातील आव्हाने समजून घेतली आहेत.
संबंधित बातम्या