BS Yediyurappa news : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व कर्नाटक भाजपचे दिग्गज नेते बी. एस. येडियुरप्पा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पॉक्सो प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एका १७ वर्षीय मुलीच्या आईनं येडियुरप्पा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. येडियुरप्पा यांनी फेब्रुवारी महिन्यात 'डॉलर्स कॉलनी' या निवासस्थानी संबंधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे येडियुरप्पा यांच्यावर भादंविच्या कलम ३५४ अ (लैंगिक छळ) व पोक्सो (Protection of Children from Sexual Offenses) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सीआयडीनं त्यांना चौकशीसाठी समन्सही बजावलं आहे.
सध्या दिल्लीत असलेल्या येडियुरप्पा यांनी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. राज्यात परतल्यानंतर ते चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याचं कळतं.
सीआयडीनं १५ जूनच्या आधी आरोपपत्र दाखल करावं, अशा सूचना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिल्या आहेत. गरज पडल्यास येडियुरप्पा यांना अटक केली जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.
येडियुरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय सूडभावनेनं मला गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, माझा कायद्यावर विश्वास आहे. कायदेशीर मार्गानं आपण लढू, असं त्यांनी म्हटलं आहे.
येडियुरप्पा यांच्याविरोधात मार्च महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच पुढील तपासासाठी हे प्रकरण सीआयडीकडं देण्यात आलं. येडियुरप्पांवर आरोप करणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचा गेल्या महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगानं एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. येडियुरप्पा यांना कार्यालयात बोलावून सीआयडीनं एप्रिल महिन्यात त्यांच्या आवाजाचे नमुने गोळा केले. तपास यंत्रणेनं सीआरपीसीच्या कलम १६४ अंतर्गत पीडितेचा आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं या प्रकरणात सीआयडीची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अशोक नायक यांची नियुक्ती केली आहे.
संबंधित बातम्या