Noida News : खळबळजनक! सुप्रीम कोर्टात वकिली करणाऱ्या महिलेचा पतीनं केला उशीनं तोंड दाबून खून
Noida woman lawyer murder case : वकील महिलेचा खून करून फरार झालेल्या बिझनेसमन पतीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.
Noida woman lawyer murder case : सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या पत्नीचा उशीनं तोंड दाबून खून करून फरार झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तो एका स्टोअर रूममध्ये लपून बसला होता. खुनाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
नोएडातील सेक्टर ३० परिसरात राहणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या महिला वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. रेणू यांच्या भावानं मेहुण्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मात्र, रेणू सिंह यांचा पती खुनाच्या दिवसापासून गायब झाला होता. आज पहाटे त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६१ वर्षीय रेणू सिन्हा पती नितीन नाथ सिन्हा याच्यासोबत राहत होत्या. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून वर्षातून एक-दोनदा नोएडाला यायचा. रेणूच्या भावानं रविवारी बहिणीला फोन केला. अनेकदा फोन करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं मित्रासह तो रेणूच्या घरी पोहोचला. तेव्हा घराचा दरवाजा बंद दिसला. मात्र आत दिवे लागलेले होते. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं त्यानं पोलिसांना माहिती दिली.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराचं कुलूप तोडलं असता रेणू सिंह बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. पोलिसांनी सर्व बाबी लक्षात घेऊन तपास सुरू केला. आपला मेहुणा नितीन बहिणीवर अत्याचार करत असे, तिल सतत त्रास देत असे. त्यानंच हा खून केल्याचा संशय त्यानं व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे शोध घेऊन नितीन सिन्हा याला ताब्यात घेतलं.
सततच्या वादातून खून
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू आणि नितीन यांच्यात नेहमी वाद व्हायचे. अनेकदा हाणामारी व्हायची. रेणूच्या मुलाचंही वडिलांशी पटायचं नाही. नोएडाला आल्यानंतरही तो वडिलांशी बोलायचा नाही. या साऱ्यातूनच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. रेणूचा खून दोन दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे. खुनामागील कारणांचाही पोलीस तपास करत आहेत.
रेणू सिन्हा कॅन्सरनं त्रस्त होत्या
मृत रेणू सिन्हा कर्करोगानं आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वीच त्या कॅन्सरमधून बऱ्या झाल्या होत्या, अशी माहितीही पोलिसांनी दिली.