Centipede Founded In Ice Cream In Noida: मुंबईत आईस्क्रीममध्ये माणसाच्या बोटाचा तुकटा सापडल्यानंतर एकच खळबळ माजली. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमबॉक्समध्ये विषारी गोम आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दीपा नावाच्या या रहिवाशाने सांगितले की, तिने ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटच्या माध्यमातून अमूल आईस्क्रीमचा बॉक्स मागवला होता. तिने आईस्क्रीमपॅक उघडला तेव्हा तिला आत मृत गोम दिसली. तिने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून एक्सवर शेअर केला.
दीपाचा दावा आहे की, तिने या घटनेबद्दल ताबडतोब ब्लिंकिटशी संपर्क साधला, ज्याने तिची रक्कम परत केली. या घटनेबाबत अमूलचा प्रतिनिधी संपर्क साधेल, असे आश्वासन क्विक-कॉमर्स सेवेने दिले आहे, मात्र अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही, असे त्या म्हणाल्या. 'अमूल'च्या एकाही प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असे ट्रायसिटी टुडेशी बोलताना त्या म्हणाल्या. मी त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. मला प्रतिसाद न मिळाल्यास मी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार आहे.
मुंबईतील एका दुकानातून डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा आढळून आला होता. युम्मो आईस्क्रीम कंपनीने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची तक्रार मुंबईतील एका डॉक्टरने दाखल केल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी युम्मो आईस्क्रीम कंपनीशी संबंधित दोन उत्पादन कारखान्यांना भेट दिली.
अधिकाऱ्यांनी शुक्रवारी इंदापूर येथील कंपनीच्या थर्ड पार्टी क्रीम निर्मिती कारखान्याला आणि हडपसर येथील परिसराला भेट देऊन नमुने व कच्चा माल तपासणीसाठी गोळा केला. १३ जून रोजी मालाड पोलिसांत या घटनेची नोंद झाल्यानंतर यमो आईस्क्रीम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
याप्रकरणी मालाड पोलिसांनी आईस्क्रीम कंपनीच्या अज्ञात अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २७२ (खाद्यपदार्थात भेसळ), २७३ (घातक बनलेले अन्न किंवा पेय विकणे) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात आणणारे बेदरकार आणि धोकादायक कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. माणसाच्या बोटाचा तुकडा फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला.