Noida Traffic Police News: होळी उत्सवादरम्यान रस्त्यांवर स्टंट करणे उत्तर प्रदेशातील दोन मुलींना महागात पडले असून नोएडा वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून भरमसाठ दंड वसूल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पोलिसांनी अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. चालत्या स्कूटरवर टायटॅनिक पोज देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दोन मुलींचा समावेश असलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये हे दोघे स्कूटरच्या मागच्या सीटवर बसून होळीचा सण साजरा करताना दिसत आहेत. रायडर पुढे जात असताना रंग लावताना ते एकमेकांसमोर बसले होते. रिल म्हणून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि नेटकऱ्यांनी नोएडा ट्रॅफिक पोलिसांना या दोघांनी केलेल्या वाहतुकीच्या उल्लंघनाची माहिती दिली.
नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची दखल घेतली. तसेच सोशल मीडियाद्वारे स्कूटर स्टंट करणाऱ्या दोन मुलींवर कारवाई केल्याची माहिती दिली. नोएडा पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वरील तक्रारीची दखल घेत संबंधित वाहनावर नियमानुसार ई-चलान कापून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी या दोघांना कोणत्या कलमान्वये दंड ठोठावण्यात आला, याचा खुलासा केला. मोटार वाहन कायद्याने ठरवून दिलेल्या वाहतुकीच्या नियमांनुसार या दोघांनी अशा सहा नियमांचे उल्लंघन केले. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपल रायडिंग, धोकादायक वाहन चालविणे आदींचा समावेश आहे.
नोएडामध्ये होळीच्या पूर्वसंध्येला आणखी एक स्कूटर स्टंट व्हिडिओ समोर आला. चालत्या स्कूटरच्या मागच्या सीटवर एक मुलगी उभी असल्याचे दिसून आले. व्हिडिओ संबंधित मुलगी प्रसिद्ध 'टायटॅनिक पोज' देत आहे, असे दिसत आहे. दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्यानंतर मुलगी खाली पडते. मात्र, ती मोठ्या दुखपतीपासून थोडक्यात बचावते. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनीही या वाहतूक उल्लंघनाची दखल घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.