Noida Rape Case: दिल्लीजवळच्या नोएडामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मित्रांनी एका महिलेला गुंगीचे औषध पाजले व त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार महिन्यांची गर्भवती महिला नराधमांसमोर हात जोडून विनंती करत होती की, तिच्या पोटात बाळ आहे, अत्याचार करू नका. मात्र वासनांध झालेल्या आरोपींनी तिचे काही न ऐकता तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर तिला घराजवळ सोडून ते पळून गेले. महिला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचली तर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिला भटकत दुसऱ्या पोलीस ठाण्यात गेली व आपली आपबिती सांगितली.
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना राजधानी दिल्लीच्या शेजारील नोएडा येथील आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा सेक्टर ६३ मध्ये नराधमांनी महिलेवर अमानूष अत्याचार केला. आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते. त्यापैकी दोघे तिचे मित्र होते. ते ऑफिसमध्ये सोबत काम करत होते. आरोपींनी आधी महिलेचे ऑफिसमधून अपहरण केले व त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
महिला नोएडा सेक्टर ६३ येथील एका प्रायव्हेट कंपनीत काम करते. २० वर्षीय पीडिता नोएडामध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहते. महिला ४ महिन्यांची गर्भवती आहे. ३ जुलै रोजी दुपारी तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या समीर नावाच्या व्यक्तीने तिला आपल्यासोबत कामानिमित्त येण्यास सांगितले. समीरने पीडितेला सांगितले की, त्याच्या काकाची तब्येत बिघडली आहे व त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला जायचे आहे. पीडिता समीरसोबत त्याच्या मोटारसायकलीवरून निघाली. खोडा कॉलनीमध्ये समीरने बाइक थांबवली व महिलेला जवळच थांबलेल्या बोलेरो कारमध्ये बसण्यास सांगितले.कारमध्ये समीरचे दोन मित्र आधीपासून बसले होते. त्यातील एकाचे नाव सतेंद्र आहे. मात्र तिसऱ्या तरुणाला महिला ओळखत नव्हती.
कारमध्ये बसताच तिन्ही आरोपींनी महिलेला सॉफ्ट ड्रिंक पाजली. पीडितेचा आरोप आहे की, ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळलाहोता. पीडिताबेशुद्ध झाल्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडिता शुद्धीवर आली तिने सांगितले की, ती गर्भवती आहे, मला सोडून द्या. मात्रा तिघांनी तिच्यावर काहीही दयामया न दाखवता पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी पीडितेला तिच्या घराजवळ सोडले व पसार झाले.
घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा महिला सेक्टर ६३ येथील ठाण्यात पोहचली तेव्हा पोलिसांनी तिचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यानंतर पीडितेने दिल्लीतील सनलाइट कॉलनी येथील पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तिची एम्समध्ये वैद्यकीय चाचणी केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.