Nobel In Economic Sciences : अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक जाहीर झालं आहे. अमेरिका आणि ब्रिटेनमधील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांची निर्मिती व त्यांचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
एखाद्या देशात संस्था कशा तयार होतात आणि त्यांचा समृद्धीवर कसा परिणाम होतो यावर त्यांनी संशोधन केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा नोबल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी या बाबत घोषणा केली. तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना ११ दशलक्ष क्रोनर (१.१ दशलक्ष डॉलर) चे पारितोषिक दिले जाणार आहे. असेमोग्लू आणि जॉन्सन मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. रॉबिन्सन शिकागो विद्यापीठात संशोधन करतात.
काही देश आर्थिक क्षेत्रात यशस्वी होतात आणि काही अयशस्वी का होतात ? या संशोधनाबद्दल डेरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिले, असे रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने स्टॉकहोम येथे जाहीर करताना सांगितले.
ज्या समाजात कायदा व सुव्यवस्था चांगली नाही आणि लोकसंख्येचे शोषण केले जाते, त्या समाजात देशाचा विकास होऊ शकत नाही. पुरस्कार विजेत्यांच्या संशोधनामुळे असे का घडते हे समजण्यास मदत होते. अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक समितीचे समितीचे अध्यक्ष जेकब स्वेनसन म्हणाले, "देशांमधील उत्पन्नातील मोठी तफावत भरून काढणे हे आपल्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. हे साध्य करण्यासाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व पुरस्कार विजेत्यांनी दाखवून दिले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या संशोधनामुळे देश अपयशी किंवा यशस्वी का होतात याची मूळ कारणे अधिक सखोल पणे समजली आहेत.
अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्थशास्त्रातील स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात स्वीडिश मध्यवर्ती बँकेने १९६८ मध्ये केली होती. आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार स्थापन झालेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील कामगिरीसाठी दरवर्षी हे पुरस्कार जाहिर केले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. त्यांचे यांचे १८९६ मध्ये निधन झाले होते. गेल्या वर्षी क्लॉडिया गोल्डिन यांना महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावे यासाठी केलेल्या संशोधनासाठी अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले होते.
संबंधित बातम्या