मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway : भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार का? रेल्वेमंत्र्यांनी मांडली रोखठोक भूमिका

Indian Railway : भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार का? रेल्वेमंत्र्यांनी मांडली रोखठोक भूमिका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 20, 2023 04:04 PM IST

Railway Privatisation : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचं खाजगीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता रेल्वेमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Ashwini Vaishnaw On Railway Privatisation
Ashwini Vaishnaw On Railway Privatisation (PTI)

Ashwini Vaishnaw On Railway Privatisation : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक सरकारी संस्थांचं खाजगीकरण करण्यात येत आहे. एअर इंडियासह अन्य काही संस्थांचं खाजगीकरण करण्यात आल्यानंतर एलआयसी आणि भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. रेल्वेचं भारतात भलंमोठं जाळं पसरलेलं आहे. लाखो लोक रेल्वेत काम करतात. इतकंच नाही तर केवळ रेल्वेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या कोट्यवधी लोकांना रोजगार मिळत असतो. त्यामुळं भारतीय रेल्वेचं खाजगीकरण झाल्यास त्यामुळं अनेकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता मोदी सरकार रेल्वेचं खाजगीकरण करणार की नाही?, या प्रश्नाचं उत्तर रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेची सेवा फार गुंतागुंतीची आहे. भारताची सर्वात मोठी आर्थिक शक्ती ही रेल्वे आहे. त्यामुळं त्याला खाजगीकरण करण्याचा आमच्या सरकारचा कोणताही हेतू नाही. त्यामुळं मी स्पष्टपणे सांगतो की भारतीय रेल्वेचं खाजगीकरण कोणत्याही स्थितीत केलं जाणार नाही, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. रेल्वेच्या खाजगीकरणाबाबतच्या चर्चा आता जुन्या झाल्या आहेत. रेल्वे ही आपली आणि सरकारची सामाजिक बांधिलकी आहे. रेल्वेच्या कारभारात आणि सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करत असल्याचं रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

भारतीय रेल्वेच्या विकासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार खोलवर विचार करतात. अनेक शहरांमध्ये नव्या रेल्वे लाईन्स सुरू करण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून देशातील अनेक शहरं जोडली गेलेली आहे. आगामी काळात रेल्वेच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अनेक नव्या योजनांवर काम केलं जाणार असल्याचंही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point