No-Confidence Motion : पीएम मोदी मणिपूरला का गेले नाहीत?, लोकसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा
no-confidence motion in parliament : निवडणुका आल्या तर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यात आले, मग मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही?, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
no-confidence motion in lok sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाने अविश्वास ठरावावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास ठरावावर भाषण करत चर्चेला सुरुवात केली आहे. अविश्वास ठरावावर चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच लोकसभेत अविश्वास ठराव मांडणाऱ्या गौरव गोगोई यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी म्हटलं की, मणिपुरमध्ये हिंसाचार सुरू असताना पीएम मोदी विदेशात दौरे करत होते. देशाच्या एका राज्यात हिंसाचार सुरू असताना मोदींनी त्यावर मौन कशासाठी पाळलं?, आम्ही त्यांचं मौन तोडण्यासाठीच अविश्वास ठराव मांडल्याचं गौरव गोगोई यांनी म्हटलं आहे. निवडणुका लागल्या की अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यात आले, परंतु मणिपुरमधील मुख्यमंत्र्यांचा अद्यापही राजीनामा का घेण्यात आला नाही?, असा सवाल करत गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मणिपुरमध्ये मैतेई आणि कुकी-नागा या समाजांना भांडवणारे लोक कोण आहे?, मणिपुरमध्ये आग लावणाऱ्या लोकांवर पीएम मोदी कधी कारवाई करणार आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत गौरव गोगोई यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. राजासाठी कोणत्याही राज्यात किंवा लोकांमध्ये भेद असू शकत नाही. मग मणिपुरकडे पीएम मोदी यांनी का दुर्लक्ष केलेलं आहे?, स्वत:च्या प्रतिमेसाठी ते मणिपुरवर बोलत नाही, त्यांनी तातडीने मणिपुरला जाऊन अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेल्या राजधर्माचं पालन करायला हवं, असंही गौरव गोगोई यांनी म्हटलं आहे. मणिपुरमध्ये पाच हजार लोकांकडे हत्यारं असून दोन महिन्यांपासून आरोपी पोलीस ठाण्यातील शस्त्र लूटून नेत आहे. याला कोण जबाबादार आहे?, याची उत्तरं मोदींनी लोकसभेत द्यायला हवी, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली आहे.