JDU Withdraws BJP Govt Support : भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं (JDU) भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनं मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मणिपूर विधानसभेत जनता दल युनायटेडचे अब्दुल नासिर हे एकमेव आमदार आहेत. जेडीयू एनडीएमध्ये असल्यामुळं नासिर हे मणिपूर सरकारसोबत होते. विधानसभेत ते सत्ताधारी बाकांवर बसत होते. मात्र, पक्षानं आता राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना पत्र लिहून पाठिंबा काढल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आमच्या आमदाराची बसण्याची व्यवस्था विरोधी बाकांवर करावी, अशी विनंतीही केली आहे.
नितीशकुमार यांनी भाजप सरकारचा पाठिंबा नेमका का काढून घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. येत्या काही तासांत पक्षाकडून याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
संयुक्त जनता दलानं पाठिंबा काढला असला तरी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कुठलाही धोका नाही. भाजपला विधानसभेत मजबूत बहुमत आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजपकडं ३७ जागा आहेत. तसंच, भाजपला नागा पीपल्स फ्रंटच्या ५ आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे.
मणिपूरमध्ये २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलानं ६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यापैकी पाच आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्यापही सभापतींच्या न्यायाधिकरणासमोर प्रलंबित आहे.
मणिपूरमध्ये कुकी आणि मैती यांच्यात झालेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२४ मध्ये कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीनं (NPP) भाजपप्रणित सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. भाजप सरकार राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप एनपीपीनं केला होता.
संबंधित बातम्या