BJP JDU Alliance : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी फिक्या पडतील आणि सामान्य मतदाराचं डोकं चक्रावून जाईल असं राजकारण सध्या बिहारमध्ये घडत आहे. बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार हे पुन्हा एकदा कोलांटउडी मारण्यास सज्ज झाले आहेत. नितीश कुमार भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता असून येत्या रविवारीच ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं सूत्रांकडून समजतं.
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला विरोध करत २०१४ साली काँग्रेसच्या तंबूत गेलेले नितीश कुमार यांनी मधल्या काळात पुन्हा भाजपशी सूत जुळवलं होतं. मात्र, भाजप हा आपला पक्ष संपवत असल्याची भावना झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या गोटात प्रवेश मिळवला होता. लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी व काँग्रेसशी युती करून आपलं मुख्यमंत्रीपद टिकवलं. जवळपास दीड वर्षांच्या संसारानंतर आता पुन्हा नितीश कुमार भाजपशी जवळीक साधू लागले आहेत. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यामुळं राजकीय हालचालींना वेग आला आहे.
देश पातळीवर भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांचा पुढाकार होता. इंडिया आघाडीचे निमंत्रक होण्याची व कालांतरानं पंतप्रधानपदावर दावा ठोकण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, या पदावर इंडिया आघाडीत एकमत झालं नाही. त्यातच राज्यात लालू यादव यांच्या पक्षाशी त्यांचे मतभेद वाढले होते. तेजस्वी यादव हे बिहारचं भविष्यातील नेतृत्व असेल असं लालू सांगू लागले होते. नितीश कुमार यांना हे खटकत होतं. त्यामुळं त्यांनी नवा डाव मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे दिल्लीला रवाना झाले आहेत. राजकारणात बंद दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. दुसरीकडं, पाटण्यात संयुक्त जनता दलानं सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील निर्णय शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यास भाजपनं बहुतेक ठिकाणी अवलंबलेला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्मुला बिहारमध्येही लागू केला जाईल, असं समजतं. भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे. सुशीलकुमार मोदी यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी बसवलं जाण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या