FASTag पासमुळे कसे वाचतील ७ हजार रुपये, आवश्यक आहे का खरेदी करणे, वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  FASTag पासमुळे कसे वाचतील ७ हजार रुपये, आवश्यक आहे का खरेदी करणे, वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

FASTag पासमुळे कसे वाचतील ७ हजार रुपये, आवश्यक आहे का खरेदी करणे, वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 19, 2025 11:35 AM IST

Fastag Annual Pass: या पासची किंमत तीन हजार रुपये असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे महामार्गांवर विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.

AI Image
AI Image (magicstudio)

Fastag Annual Pass: केंद्र सरकारने फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पास प्रणालीची घोषणा केली. या पासमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा पास घेणे बंधनकारक राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील.

काय आहे वार्षिक FASTag पास

या पासची किंमत तीन हजार रुपये असेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे महामार्गांवर विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. पास सुरू झाल्याच्या तारखेपासून हा पास एक वर्ष किंवा २०० प्रवासांसाठी (जे आधी असेल) वैध आहे.

किती होईल बचत

१ ट्रिप म्हणजे १ टोल क्रॉसिंग म्हणजेच प्रवासी एक बाजू पार करू शकतील. तर, तीन हजार रुपयांच्या पासनंतर प्रवाशाला २०० फेऱ्या म्हणजेच २०० टोल क्रॉसिंग मिळणार आहेत. १ टोल क्रॉसिंगचा सरासरी खर्च केवळ १५ रुपये असेल, असे गडकरी यांनी सांगितले आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका टोलसाठी ५० रुपये भरले तर २०० टोलसाठी तुम्हाला १०,००० रुपये द्यावे लागतील. आता या पासनंतर तुमची किमान ७ हजार रुपयांची बचत होणार आहे.

पास कोणाला मिळेल?

कार, जीप, व्हॅन अशा बिगर व्यावसायिक खासगी वाहनांसाठी खास डिझाइन करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. वार्षिक पास केवळ राष्ट्रीय महामार्ग (एनएच) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (एनई) टोल नाक्यांवर वैध आहे. महामार्ग मंत्रालयाने सांगितले की, वार्षिक पास केवळ खाजगी बिगर-व्यावसायिक कार / जीप / व्हॅनसाठी लागू आहे. कोणत्याही व्यावसायिक वाहनासाठी वापरल्यास कोणतीही सूचना न देता ते तात्काळ निष्क्रिय केले जाईल.

खरेदी करणे आवश्यक आहे का?

गडकरींच्या घोषणेनंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले की, ज्यांच्याकडे आधीच 'फास्टॅग' आहे त्यांना नवीन फास्टॅग खरेदी करण्याची आवश्यकता नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की, "वार्षिक 'पास' आपल्या विद्यमान फास्टॅगवर सक्रिय केला जाऊ शकतो, जर तो पात्रतेच्या निकषांची पूर्तता करतो (म्हणजे, तो वाहनाच्या विंडशील्डला योग्यरित्या चिकटवला गेला असेल, वैध वाहन नोंदणी क्रमांकाशी जोडला गेला असेल, काळ्या यादीत टाकला गेला नसेल इत्यादी).

कसा करायचा अर्ज

याची लिंक लवकरच महामार्ग यात्रा अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

आता काय व्यवस्था आहे?

सध्या विशिष्ट टोलनाक्यावरून वारंवार जाणाऱ्या वाहनांसाठी मासिक 'पास' उपलब्ध आहेत. या 'पासेस'ची किंमत दरमहा ३४० रुपये आणि वर्षाला ४,०८० रुपये आहे, जे पत्ता पडताळणी आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करून मिळवता येते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर