Nitin Gadkari on Road Accident : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद भवनाबाहेर झालेल्या गदारोळानंतर गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाले. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात भारतातील रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
रस्ते अपघातावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अनेक देशांनी अपघातांची संख्या शून्यावर आणली. पण, भारतात दरवर्षी अनेकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. ही चिंतेची बाब आहे. भारतात आपण अद्याप रस्ते अपघतांवर नियंत्रण आणू शकलो नाही. गडकरी म्हणाले, सरकार या बाबींबाबत खूप गंभीर आहे. मात्र, अनेक प्रयत्न करूनही रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. त्यामुळं परदेशात गेल्यावर मला लाज वाटते. माझ्यावर तोंड लपवण्याची वेळ येते, असे नितीन गडकरी म्हणाले.
आम आदमी पक्षाचे खासदार गुरमीत सिंह यांनी रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्दिष्टांबाबत गुरुवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते, गडकरी म्हणाले की, मी ११ वर्षांपासून या मंत्रालयात आहे. स्वीडनसारख्या अनेक देशांमध्येही रस्ते अपघात शून्यावर आले आहेत, हे खरे आहे. म्हणूनच जेव्हा मी जागतिक परिषदेला जातो तेव्हा मी माझा चेहरा लपवण्याची वेळ माझ्यावर येते. कारण जगात सर्वाधित रस्ते अपघात होत असतील तर त्यात आपल्या देशाचा क्रमांक लागतो. २०२४ च्या अखेरीस रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करू, असे मी म्हटले होते. पण अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहे. हा एक असा मुद्दा आहे जिथे आपण यशस्वी होऊ शकलो नाही.
रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्दिष्टांवर नितीन गडकरी म्हणाले की, केवळ कायदे करून ही समस्या सुटणारी नाही. जोपर्यंत समाज पुढाकार घेत नाही तो पर्यंत वाढते अपघात कमी होऊ शकणार नाहीत. या साठी मानवी वर्तन बदलण्याची गरज आहे. जो पर्यंत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याचा आदर निर्माण होत नाही, तोपर्यंत वाढते अपघात थांबणे कठीण काम आहे. येत्या काळात लोकांच्या सहकार्याने हे अपघात कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे गडकरी संसदेत म्हणाले. यावेळी नितीन गडकरी यांनी स्वत:सह आणि कुटुंबासमवेत महाराष्ट्रात झालेल्या एका रस्ते अपघाताचाही उल्लेख केला, ज्यात त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले. 'मी संवेदनशील आहे, कारण मी स्वत: आपघातला बळी पडलो आहे, " असे गडकरी म्हणाले.