बेडरूमच्या आड एका फटीत तब्बल नऊ फूट लांब किंग कोब्रा लपलेला असल्याचे पाहून कर्नाटकात एका कुटुंबाच्या सदस्यांची मोठाच घाबरगुंडी उडाली होती. फ्लॅटच्या पोटमाळ्यात एका लाकडी डब्यात विषारी सरपटणारे प्राणी घुसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते. या कुटुंबीयांनी तातडीने वनविभागाला मदतीसाठी बोलावले. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा भला मोठा लांबलचक साप आतून बाहेर काढला तेव्हा कुटुंबीयांना मोठाच धक्का बसला होता.
वनविभागाचे क्षेत्रीय संचालक अजय गिरी यांना या रेस्क्यु ऑपरेशनबाबत माहिती देऊन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल आहे. फोनवरून माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या टीमने घरातील सदस्यांना काय करावे आणि काय करू नये याबाबत सुरक्षिततेचे उपाय सांगून तातडीने घराकडे धाव घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन बेडरूममधून किंग कोब्रा सापाची शिताफीने सुटका केली, असं गिरी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडिओमध्ये वन विभागाचे बचावपथक एका लाकडी बॉक्समध्ये अडकलेल्या किंग कोब्राकडे जाताना दिसत आहे. पलंगावर उभ्या असलेल्या पथकातील एका सदस्याने काठीचा वापर करून मोठ्या कौशल्याने कोब्राला बाहेर काढून काळ्या पिशवीत टाकले. सापाला पाहून हादरलेलं संपूर्ण कुटुंब हे दृष्य सुरक्षित अंतरावरून पाहत असल्याचं दिसून येतं. दरम्यान, सापाला पकडून बेडरूमबाहेर नेल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केलं. शिवाय सापासारखे सरपटणारे प्राणी घरात घुसल्यास कोणत्या प्राथमिक उपाययोजना कराव्या याबद्दल स्थानिकांसाठी जनजागृती सत्र आयोजित केले होते. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापाला जंगल नेऊन सोडून दिले. ‘आम्ही सापाला हळूवारपणे पकडून नंतर जंगलात नेऊन सोडलं’ असं गिरी यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
बेडरूममध्ये साप घुसल्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला. थोड्या कालावधीच या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या क्लिपमुळे कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडला. व्हिडिओ पाहून एका युजरने घडलेल्या घटनेच्या भयानक स्वरूपाबद्दल लिहून वनविभागाच्या टीमने दिलेल्या त्वरित प्रतिसादाबद्दल त्यांचं कौतुक केलं.
घरात एवढा धोकादायक प्राणी असल्याच्या विचारावरच एका दुसऱ्या यूजरने अविश्वास व्यक्त केलं. ‘माझ्या खोलीत कोब्रा लपल्याची मी कल्पनाही करू शकत नाही... विचार करायलाही खूप भीती वाटते!’ अशी प्रतिक्रिया या यूजरने लिहिली आहे.
तिसऱ्या युजरने रेस्क्यू टीमने दाखवलेले धाडस आणि कौशल्याचे कौतुक करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘रेस्क्यू टीमच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे सोपं काम नव्हतं!’ अनेक युजर्सना साप पुन्हा जंगलात शिरतानाचे दृश्य विलक्षण मंत्रमुग्ध करणारे वाटले. ‘हा सुंदर साप आहे!’ अशी प्रतिक्रिया एका यूजरने व्यक्त केली आहे.