Toll Plaza News : कारने लॉन्ग ड्राइव्हला जाण्यासाठी अनेकांना आवडतं. देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तीर्ण झाले असून यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, या प्रवासात टोलमध्ये व्यत्यय येतो. टोल भरण्यासाठी टोल केंद्रांवर मोठ्या रांगा असल्याने येथे मोठा वेळ जातो. मात्र, आता प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) टोल प्लाझावरील IT प्रणाली व हार्डवेअरमध्ये मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फास्टॅगचे व्यवहार सध्याच्या तुलनेत अधिक जलद होतील. व्यवहारांच्या जलद प्रक्रियेमुळे टोल प्लाझावर लागणारा वेळ यामुले कमी होणार आहे.
आत्तापर्यंत, अनेक टोल प्लाझावर लावण्यात आलेली उपकरणे फास्टॅग वेगाने वाचू शकत नव्हती. यामुळे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना हातातील उपकरणांनी टॅग स्कॅन करावे लागत होते. त्यामुळे टोल घेण्यास मोठा कालावधी लागत होता. तसेच टोल केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा देखील लागत होत्या. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ टोलवर वाया जात होता. तसेच अनेकदा तर टोल कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात टोल वासुलीला लागणाऱ्या वेळेमुळे वाद देखील होत होते.
मात्र, आता महामार्ग प्राधिकरण टोलवसूलीसाठी त्यांच्या पॅनेलमध्ये चांगला अनुभव असलेल्या कंपन्यांना ठेवणार आहे. आता त्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या STQC (स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन) द्वारे प्रमाणित उत्पादकांकडूनच उपकरणे खरेदी करावी लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल प्लाझा मॅनेजिंग युनिट IHMCL च्या मते, आता RFID रीडर, अँटेना, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर, टोल लेन कंट्रोलर आणि टोल प्लाझा सर्व्हरसाठी STQC प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. IHMCL च्या नवीन वैशिष्ट्यांनुसार, सिस्टम इंटिग्रेटर्सना IHMCL ला एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यानुसार टोल प्लाझावरील उपकरणांमध्ये काही बिघाड झाल्यास, त्यांना तात्काळ पॅनेलमधून निलंबित केले जाणार आहे.