नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारी अर्थशास्त्रज्ञ क्लाउडिया गोल्डिनयांच्या फेक सोशल मीडिया अकाउंटद्वारे पसरवण्यात आली होती. एक्सवर क्लाउडिया गोल्डिन नावाच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, -एक दु:खद बातमी. माझे सर्वात प्रिय प्रोफेसर अमर्त्य सेन यांचे काही मिनिटांपूर्वी निधन झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत..प्रा. अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.
मित्रांनो, तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद पण ही बातमी खोटी आहे: बाबा पूर्णपणे बरे आहेत. आमचे संपूर्ण कुटूंब केम्ब्रिजमध्ये आहे. बाबा हार्वर्डमध्ये आठवड्यातून २ अभ्यासक्रम शिकवत आहेत. त्याचप्रमाणे ते त्यांच्या पुस्तकावरही काम करत आहे. - नेहमीप्रमाणे व्यस्त!
सेन यांची मुलगी नंदना देव सेन यांनी आपल्या वडिलांच्या निधनाचे वृत्त अफवा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपले वडील एकदम ठीक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अमर्त्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ मध्ये बंगालमधील शांती निकेतन येथे झाला होता. त्यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील मानाचे नोबेल पुरस्कार मिळाले होते. इकोनॉमिक्समध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.
अमर्त्य सेन यांच्या आजीचे रवींद्रनाथ टागोर यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनीच अमर्त्य सेन हे नाव ठेवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण संत जॉर्ज स्कूल ढाक्का येथे झाले. त्यांचे वडील आशुतोष सेन ढाका विद्यापीठात केमेस्ट्रीचे प्राध्यापक होते. बंगाली कुटूंबात जन्म झालेल्याअमर्त्य सेन यांचे संपूर्ण कुटूंब शिक्षित व पुरोगामी विचारांचे होते.