मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बिहारमधील बकरा नदीवर नव्याने बांधलेला पूल पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोसळला, पाहा Video

बिहारमधील बकरा नदीवर नव्याने बांधलेला पूल पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोसळला, पाहा Video

Jun 18, 2024 07:59 PM IST

bridge collapsed in bihar : हा पूल बिहारमधील अररिया जिल्ह्यातील कुर्सा कांता आणि सिक्ती भागांना जोडतो. नव्यानेच बांधलेला व पूल नदीत कोसळला.

बकरा नदीवरील पूल कोसळला
बकरा नदीवरील पूल कोसळला (ANI)

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील पररिया गावात बकरा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग नदीत कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोसळलेल्या पुलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हा पूल अररिया जिल्ह्यातील कुर्सा कांता आणि सिक्ती भागांना जोडतो. राज्य सरकारने नुकतेच त्याचे बांधकाम केले आहे. मात्र, पुलाकडे जाण्यासाठी संपर्क मार्ग तयार न झाल्याने तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज

अररियाचे पोलीस अधीक्षक अमित रंजन यांनी सांगितले की, अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. बकरा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकारी तेथे पोहोचले आहेत,' अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

पूल कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सिक्टीचे आमदार विजय कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेसाठी बांधकाम कंपनीच्या मालकाला जबाबदार धरले. बांधकाम कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला आहे. प्रशासनाने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.

सुपौल जिल्ह्यात मार्च महिन्यात कोसी नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळल्यानंतर ही ताजी घटना घडली आहे. सुपौल येथे पूल कोसळून एकाचा मृत्यू झाला होता, तर १० जण जखमी झाले होते.

पूल कोसळण्याच्या घटनेवर नागरिकांच्या प्रतिक्रिया -

"बिहारमध्ये दरवर्षी असे घडते. हे रुटीन काम आहे," असं एका युजरने म्हटलं आहे. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, "बिहार आणि पूल दुर्घटनेची कधीही न संपणारी कहाणी आहे.

बांधकामाचा हा अत्यंत हास्यास्पद दर्जा आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे! त्यासाठी खर्च आणि खर्चावर सखोल गुंतवणुकीची गरज आहे. या सगळ्याला जबाबदार कोण?, अशी पोस्ट एका तिसऱ्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

WhatsApp channel
विभाग