Sanjay Raut : नवीन संसद भवन फाइव्ह स्टार जेलसारखे, आमचं सरकार आल्यानंतर...; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sanjay Raut : नवीन संसद भवन फाइव्ह स्टार जेलसारखे, आमचं सरकार आल्यानंतर...; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut : नवीन संसद भवन फाइव्ह स्टार जेलसारखे, आमचं सरकार आल्यानंतर...; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Feb 29, 2024 02:22 PM IST

Sanjay Raut on new sansad bhavan : नवीन संसद भवन हे एखाद्या फाइव्ह स्टार जेलसारखं असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on Central Vista
Sanjay Raut on Central Vista

Sanjay Raut on new sansad bhavan : ‘देशाचं नवीन संसद भवन हे एखाद्या फाइव्ह स्टार जेलसारखं आहे. तिथं ना नीट बसता येतं, ना काम करता येतं…,' असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र सरकार दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात मंत्रालय परिसर विकसित करणार आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर संजय राऊत वरील विधान केलं. 'महाराष्ट्र सरकारनं हे सगळं करण्याआधी सेंट्रल व्हिस्टाची परिस्थिती नेमकी कशी आहे ती दिल्लीत जाऊन आधी बघायला हवी. जे संसद भवन उभारलं आहे, ते ना काम करण्यासारखं आहे, ना बसण्यासारखं. ते एक फाइव्ह स्टार जेल बनलं आहे, असं राऊत म्हणाले.

‘संसद भवन हा आमचा ऐतिहासिक ठेवा आहे. जुनं संसद भवन ऐतिहासिक आहे. आमचं सरकार पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच ऐतिहासिक इमारतीत अधिवेशन घेऊ,’ असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

मोदींनी ६०० पारचं लक्ष्य ठेवायला हवं!

आगामी निवडणुकीत एनडीएला ४०० पार जागा मिळतील, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यावर विचारलं असता, ‘मोदींनी छोटा आकडा सांगितला आहे. त्यांनी ६०० पारचं लक्ष्य ठेवायला हवं होतं. देशाच्या संसदेतील सदस्यांची संख्या ५४५ आहे. त्यापेक्षा ५० जास्त आमचे निवडून येतील असं पंतप्रधानांनी बोलायला हवं. म्हणजे लोक टाळ्या वाजवतील,’ असं राऊत म्हणाले.

मोदींना खोटं बोलायची सवय!

पंतप्रधान मोदी हे नुकतेच यवतमाळ दौऱ्यावर आले होते. त्यावरूनही राऊत यांनी तोफ डागली. ‘पंतप्रधान ज्या यवतमाळमध्ये आले होते, तिथं शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. दोन हजारपेक्षा जास्त आत्महत्या यवतमाळ-वाशिममध्ये झाल्या आहेत. काय केलं सरकारनं? पंतप्रधान मोदी जाहीर सभेत सरळ सरळ खोटं बोलतात. खोटं बोलण्याची त्यांना नशा आहे. ती कोठून येते माहीत नाही. पंतप्रधानपदी बसलेला माणूस इतका खोटं कसं बोलू शकतो,’ अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.

शरद पवार उत्तम कृषीमंत्री असं मोदीच म्हणाले होते!

यवतमाळच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. ‘पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च उत्तम कृषीमंत्री असं सर्टिफिकेट शरद पवारांना दिलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमध्ये वाद व्हायचा, तेव्हा कृषीमंत्री म्हणून शरद पवार हे गुजरातला मदत करायचे असं खुद्द मोदींनीच सांगितलंय,’ याकडंही राऊत यांनी लक्ष वेधलं.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर