New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (१५ फेबुवारी) भीषण दुर्घटना घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ व १६ वर चेंगराचेंगरी झाली असून यात ३ मुलांसह १८ जण ठार झाले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री प्रचंड गर्दी आणि गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ महिला, पाच लहान मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. या यात्रेसाठी हजारो महाकुंभ भाविक जमले होते. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या गोंधळामुळे काही महिला बेशुद्ध झाल्या. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. काही मुले त्यांना खांद्यावर घेऊन जात आहेत. तर काही जण आपले समान शोधत आहेत. या गर्दीमुळे गुदमरल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्लॅटफॉर्मवर चार महिला प्रवासी बेशुद्ध झाल्या. दिल्ली अग्निशमन दलाला या बाबत तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथकही मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी वाढल्याने प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली. डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा म्हणाले, प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती. त्यावेळी तिथे बरेच लोक होते. स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी गाड्याही उशिरा धावल्या. त्यांचे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर होते. प्राथमिक माहितीनुसार काल दर तासाला १५०० जनरल तिकिटांची विक्री झाली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. घटनेनंतर प्लॅटफॉर्म आणि पायऱ्यांवर कपडे, चप्पल, शूज आणि इतर वस्तू विखुरलेल्या होत्या.
महाकुंभासाठी दोन विशेष गाड्या चालविण्यास उशीर झाल्याने प्रयागराजमध्ये गर्दी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिस्थिती अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे. सध्या प्रशासनाकडून परिस्थितीचा तपास केला जात असून दोषींवर कडक कारवाई ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्टेशनच्या सर्व प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती. पण प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३, १४ आणि १५ वर परिस्थिती बिकट होती. रेल्वेकडून गाड्या थांबण्यासंदर्भात प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याची वारंवार घोषणा करण्यात आल्याने ही चेंगराचेंगरी झाली. रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती. प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर बनारस सुपरफास्ट स्पेशल उभी होती. तर स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वरही या दोन्ही गाड्यांचे प्रवासी उपस्थित होते. गर्दी वाढत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या एस्केलेटरजवळ अचानक चेंगराचेंगरी झाली. रेल्वेकडून दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती, त्यामुळे स्थानकांवरील गर्दी वाढली आणि परिस्थिती बेकाबू झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
एवढी मोठी गर्दी झाली होती पण या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिस यंत्रणा नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिस दलाचा एकही जवान घटनास्थळी नव्हता. एका प्रत्यक्षदर्शीने एएनआयला सांगितले की, नागरिक चेंगराचेंगरीमुळे जिवाच्या आकांताने पळून जात होते. लोक मोठ्या प्रमाणात स्थानकात आल्याने हा अपघात झाला. गर्दी बघायला किंवा थांबवायला कुणीच नव्हतं. प्लॅटफॉर्मवर १६ ते १२ आणि १२ ते १६ पर्यंत लोक येत होते. लोक प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर पोहोचले तेव्हा गाडी १६ नंबरवर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अशा तऱ्हेने लोक तेथून आणि इथून पळून गेल्याने मध्येच चेंगराचेंगरी झाली.
संबंधित बातम्या