राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता बुधवारी 'गंभीर' श्रेणीत नोंदवली गेल्याने दिल्लीतील प्रदूषणाचे संकट आणखी गडद झाले आहे. दिल्लीत बुधवारी यंदाच्या हंगामातील पहिले दाट धुके पसरले. त्यामुळे दिल्ली विमानतळावरील दृश्यमानता शून्यापर्यंत गेल्याने विमानसेवेला फटका बसला. दिल्लीत ग्रेप तीन (Delhi GRAP-3 Restrictions) लागू झाल्याने लोकांच्या प्रवासात अडचण येऊ नये म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वेने मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे पुढील सूचना येईपर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळांचे ऑनलाइन वर्गात रूपांतर करण्यात येणार आहे. या शाळांमधील मुलांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेता येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेप तीन ३ लागू करण्यात येणार आहे.
दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने प्राथमिक वर्ग बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. दिल्लीतील शिक्षण संचालनालय (डीओई), एमसीडी, एनडीएमसी आणि डीसीबीच्या खासगी मान्यताप्राप्त आणि अनुदानित शाळांना इयत्ता पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी शाळांमधील वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्याच्या सूचना शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करतील.
प्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठल्याने वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) गुरुवारी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) जीआरएपी फेज-३ अंतर्गत निर्बंध लागू केले. राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता आज सलग दुसऱ्या दिवशी 'गंभीर' श्रेणीत राहिल्याने प्रशासनाला शुक्रवारपासून लागू होणाऱ्या प्रदूषणविरोधी कठोर उपाययोजना लागू कराव्या लागल्या आहेत.
'प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा पुढील सूचना येईपर्यंत ऑनलाइन वर्ग घेतील,' अशी माहिती मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिली आहे.
शिक्षण संचालनालयाने सर्व सरकारी, खाजगी शाळा, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आणि नवी दिल्ली नगर परिषद (एनडीएमसी) शाळांच्या प्रमुखांना इयत्ता पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑफलाइन वर्ग न घेण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पुढील आदेश येईपर्यंत हे वर्ग ऑनलाइन घेण्यास सांगितले.
दिल्लीतील विविध भागांत या धुक्याचा थर पसरला होता, असेही हवामान विभागाने सांगितले. दिल्लीत मंगळवारी दुपारी चार वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक ३३४ इतका होता. बुधवारी सकाळी नऊ वाजता तो ३६६ आणि सायंकाळी ४ वाजता ४१८ इतका नोंदवण्यात आला. दिल्ली-एनसीआरमधील जीआरएपीला हवेच्या गुणवत्ता निर्देशांक चार टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे - २०१ ते ३०० दरम्यान "खराब" वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) साठी पहिला टप्पा, "अत्यंत खराब" एक्यूआय (३०१-४००), "गंभीर" एक्यूआय (४०१-४५०) साठी स्टेज ३ आणि "अत्यंत गंभीर" एक्यूआय (४५० पेक्षा जास्त) साठी स्टेज ४.