Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला असून २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतल्याने भाजप बहुमतासह सरकार स्थापन करणार हे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच आता भाजपकडून कोणाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाते? याची चर्चा सुरू झाली आहे. व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांना दिल्लीच्या राजकारणात आणले जाईल, अशी एक चर्चा सुरु असतानाच केजरीवाल यांचा पराभव करणारे जायंट किलर प्रवेश वर्मा यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव करणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी शनिवारी सांगितले की, दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पक्षाचे हायकमांड ठरवतील. प्रवेश वर्मा म्हणाले अरविंद केजरीवाल यांनी गेल्या ११ वर्षांपासून कोणतेही काम केले नाही. अरविंद केजरीवाल फक्त खोटे बोलतात, हे दिल्लीच्या जनतेला समजले आहे.
दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री होणार का, असे विचारले असता प्रवेश वर्मा म्हणाले, 'मी असा व्यक्ती आहे जो आनंदी असताना फारसा उत्साही होत नाही किंवा अस्वस्थ झाल्यावर फार दु:खी होत नाही. भाजप हायकमांड (मुख्यमंत्रिपदाबाबत) जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल.
दिल्लीत स्थापन होणारे हे सरकार पंतप्रधान मोदींचे व्हिजन दिल्लीत आणणार आहे. या विजयाचे श्रेय मी पंतप्रधान मोदींना देतो. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान मोदी आणि दिल्लीच्या जनतेचा विजय आहे असे वर्मा यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांचा प्रवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी पराभव केला.
दरम्यान, भाजपा दिल्ली प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले की दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. आमच्या पक्षाकडे सर्व राज्यांमध्ये सामूहिक नेतृत्व आहे आणि विजयानंतर आमच्यातील कोणताही कार्यकर्ता पुढे येऊन नेता होऊ शकतो. भाजप कोणत्याही नेत्याला मोठं पद देण्यासाठी आधी जनतेची आणि नंतर कार्यकर्त्यांची मतं विचारात घेतो. त्यानंतर तो प्रस्ताव संसदीय बोर्डाकडे जातो. मग तेथे मुख्यमंत्रीपद किंवा मोठ्या पदांबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आमच्यापैकी कुणीही विधानसभेचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री बनला तरी तो एक चांगला नेताच असेल.
गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीतील राजकीय पटलावर 'आप'चे वर्चस्व आहे, तर भाजप १९९८ पासून सत्तेपासून दूर आहे. १९९८ ते २०१३ या काळात दिल्लीवर सत्ता गाजवणारी आणि पुनरुज्जीवनाची आशा बाळगणारी काँग्रेस सलग तिसऱ्यांदा पराभूत झाली आहे.
संबंधित बातम्या