Lt General Anil Chauhan (retired) appointed next CDS:देशाच्या दृष्टीने महत्वाची बातमी समोर आली आहे.भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त असलेल्या या पदावरील नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) (Lt General Anil Chauhan) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातामध्ये तामिळनाडूतील जंगलात निधन झाले होते. रावत यांच्यासोबत त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेले CDS पद कोणाकडे जाणार, याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. याबाबत अनेक अधिकाऱ्यांची नावेही चर्चेत होती. मात्र आज केंद्र सरकारकडून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांच्या नावाची घोषणाCDS म्हणून करण्यात आली.
कोण आहेत अनिल चौहान -
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना भारतीय लष्कराचा जवळपास ४० वर्षांचा अनुभव आहे. आपल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनिल चौहान यांनी लष्करातील अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कारवायांबाबत त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या याच अनुभवामुळे त्यांची सीडीएसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.