मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nepal Plane Crashes: एकही जण नाही बचावलं; नेपाळ विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा मृत्यू

Nepal Plane Crashes: एकही जण नाही बचावलं; नेपाळ विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 15, 2023 06:08 PM IST

Pokhara International Airport: नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक आज सकाळी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार क्रू मेंबर्स आणि सर्व ६८ प्रवाशांचा मृत्यू झालाय.

Nepal Aircraft Crashes Updates
Nepal Aircraft Crashes Updates

Nepal Plane Crashes Updates: नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक आज सकाळी विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच भारतीयांसह ७२ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एटीआर-७२ हे प्रवासी विमान चार क्रू मेंबर्ससह ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा मार्गावर होतं. पण पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद अगोदर या विमानाला अपघात झाला. या दुर्घटनेत सर्वजण मरण पावल्याचे वृत्त इंडिया टूडेनं दिले आहे.

यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, १ आयरिश, २ कोरियन, १ अर्जेंटीनी आणि १ फ्रेंच नागरिक होते. या दुर्घटनेत एकही जण बचावला नाही.

खराब हवामानामुळं अपघात झाल्याचा अंदाज

खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाला अपघात झाल्याचा अंदाज लावला जात आहे. विमान डोंगराला धडकल्यानंतर पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील नदीच्या किनारी आदळले. सोशल मीडियावर या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

नेपाळमध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर

पोखरा विमानतळावरील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान आणि गृहमंत्री घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे. विमानाला कशामुळं अपघात झाला? कारण शोधण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या अपघातानंतर नेपाळमध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आलाय.

तारा एअरचे विमान कोसळून २२ जणांचा मृत्यू

गेल्या वर्षी मे महिन्यात मुस्तांगच्या थासांग येथील सनो स्वारे भीर येथील डोंगरावर तारा एअरचे विमान कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात तीन क्रू आणि चार भारतीय आणि दोन जर्मन नागरिकांसह १६ नेपाळी होते.

IPL_Entry_Point

विभाग