Everest and MDH Spices Banned: गेल्या महिन्यात सुरू झालेला भारतीय मसाल्यांचा वाद थांबायचे नाव घेईना. सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर नेपाळनेही भारतीय मसाला उत्पादक कंपनी एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांमध्ये हानिकारक कीटकनाशके आढळल्याच्या आरोपानंतर नेपाळने हे पाऊल उचलले. नेपाळने त्याच्या वापरावर विक्रीवर आणि आयातीवर बंदी घातली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळच्या अन्न आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या इथिलीन ऑक्साईड कीटकनाशकासाठी दोन भारतीय उत्पादक एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांची चाचणी सुरू केली आहे.
नेपाळचे अन्न तंत्रज्ञान प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. त्यांच्या विक्रीवरही आम्ही बंदी घातली. मसाल्यांमधील हानिकारक रसायनांच्या नमुन्यांबाबतच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला. महाराजन पुढे म्हणाले की, या दोन मसाला उत्पादक मसाल्याची चाचणी सुरू आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
ब्रिटनच्या अन्न सुरक्षा एजन्सी म्हणजेच एफएसएने सांगितले की, भारतातून आयात केले जाणाऱ्या सर्व मसाल्यांची चाचणी केली जाणार आहे. त्यात इथिलीन ऑक्साईडचाही समावेश आहे. एवढेच नाहीतर, एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या या दोन्ही मसाल्यांची न्यूझीलंडमध्ये चाचणी केली जात आहे. इथिलीन ऑक्साईडमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड आणि बऱ्याच देशांमध्ये अन्न निर्जंतुकीकरणासाठी त्याचा वापर थांबविण्यात आला. कारण, एमडीएच आणि एव्हरेस्टचे मसालेही न्यूझीलंडच्या बाजारात विकले जात आहेत.
या दोन्ही कंपन्यांची केवळ परदेशातच नव्हे तर देशातही चौकशी सुरू आहे. घरगुती अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआयने विविध मसाल्यांची तपासणी तीव्र केली. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशभरातील मसाल्यांचे १ हजार ५०० हून अधिक नमुने गोळा केले आहेत आणि त्यांची कसून तपासणी केली जात आहे. जर हे सर्व नमुने चाचणीत उत्तीर्ण झाले नाहीत. तर, कंपन्यांच्या उत्पादनांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात, असे सरकारचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या