Nepal Flood: नेपाळमध्ये महापूर, बचावकार्याला आला वेग, मृतांचा आकडा २०० च्या पार!-nepal floods death toll crosses 200 as rescue efforts intensify ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nepal Flood: नेपाळमध्ये महापूर, बचावकार्याला आला वेग, मृतांचा आकडा २०० च्या पार!

Nepal Flood: नेपाळमध्ये महापूर, बचावकार्याला आला वेग, मृतांचा आकडा २०० च्या पार!

Sep 30, 2024 10:47 PM IST

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाले आहे. या घटनेत २०० हून अधिक लोकांच्या मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ३० लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

नेपाळमध्ये महापूर: मृतांची संख्या २०० पार
नेपाळमध्ये महापूर: मृतांची संख्या २०० पार (AP)

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात २०० जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्याला वेग आला आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, देशभरात २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २९ जण अद्याप बेपत्ता आहेत.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषीराम तिवारी यांनी एएफपीला सांगितले की, आम्ही आजारी असलेल्या किंवा अजूनही सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी हवाई बचाव कार्याला वेग आला आहे.

काठमांडूमध्ये सर्वाधिक मृत्यू

सर्वाधिक मृत्यू काठमांडूमध्ये झाले आहेत. शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. काठमांडूपासून १६ किलोमीटर अंतरावर बंद पडलेल्या महामार्गाजवळ दरड कोसळून अनेक वाहने जमीनीखाली गेले. या भागातील ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे काठमांडूबाहेरील सर्व महामार्ग बंद करण्यात आले होते. 

पूरग्रस्तांसाठी सरकारची घोषणा

सरकारने घरे गमावलेल्यांसाठी तात्पुरते निवारा, तसेच मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून परतत असलेले पंतप्रधान खड्गप्रसाद ओली यांनी या संकटावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.

शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद

हवामानात सुधारणा झाल्याने बचाव आणि बचावकार्याला वेग आला आहे. दक्षिण काठमांडूमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने रहिवाशांनी पूरग्रस्त घरांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमधील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहणार आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

नेपाळमध्ये विक्रमी पाऊस

नेपाळच्या हवामान विभागाने शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद केली आहे. काठमांडू विमानतळावरील मॉनिटरिंग स्टेशनमध्ये सुमारे २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी २००२ नंतरची सर्वाधिक पावसाची नोंद आहे. आयसीआयएमओडीचे हवामान तज्ञ अरुण भक्त श्रेष्ठ म्हणाले की, ‘मान्सूनचा हंगाम संपत असल्याने साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस पाऊस कमी झाला पाहिजे. अशा प्रकारचा पाऊस असामान्य आहे.’ 

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात नदी- नाले ओसांडून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली. मात्र, या पावसात अनेकांनी कुटुंबातील सदस्य गमावल्याने त्यांच्यावर दुख:चे डोंगर कोसळले.

Whats_app_banner
विभाग