Nepal Earthquake news In Marathi: नेपाळच्या पश्चिम भागात शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजण्यात आली. या भूंकपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंप झाल्यापासून बचाव दल बचाव कार्यात गुंतले आहे.
राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्याच्या लामिडांडा परिसरात होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातही सुमारे ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडू आणि परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जाजरकोट हे काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच काठमांडूतील लोक घराबाहेर पडले. भूकंपानंतर नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुष्प कमल दहल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री ११.४७ भूकंप आला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून घरांचेही प्रचंड नुकसान झाले. जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी तिन्ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत."
नेपाळमध्ये भूकंपासारख्या घटना सामान्य आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये नेपाळमध्ये ७.८ तीव्रतेचा भूंकप आला होता. या भूकंपात तब्बल १२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती.