CBI: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआय राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (पदवी) किंवा नीट-यूजी परीक्षेतील गैरव्यवहारांबद्दल रविवारी एफआयआर दाखल केला. २०२४ च्या नीट-यूजी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर सीबीआयने पावले उचलली जात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच एनटीए ५ मे रोजी नीट (यूजी) परीक्षा ओएमआर (पेन आणि पेपर) मोडमध्ये घेतली होती. मात्र, या परीक्षेत कथित गैरव्यवहार झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी फेरपरीक्षेची मागणी केली आहे.
शनिवारी केंद्राने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी शिक्षण मंत्रालयाने आढावा घेतल्यानंतर हे प्रकरण व्यापक चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. नीट-यूजीबरोबरच यूजीसी नेट, सीएसआयआर-यूजीसी नेट आणि नीट-पीजी या तीन परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यूजीसी नेट परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी केंद्राने रद्द केली होती. तर, सीएसआयआर-यूजीसी नेट आणि नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्ग प्रतिबंधक) कायदा, २०२४ अधिसूचित केला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित प्रकार रोखणे आणि संबंधित समस्यांचे निराकरण करणे हे या कायद्याचे उद्दीष्ट आहे. परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा आणि एनटीएची रचना आणि कार्यपद्धतीची शिफारस करेल. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.
एनटीए आज २३ जून रोजी टाइम लॉसमुळे प्रभावित झालेल्या १ हजार ५६३ उमेदवारांसाठी नीट यूजी फेरपरीक्षा आयोजित करणार आहे. दुपारी २ ते ५.२० या वेळेत फेरपरीक्षा होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. नीट फेरपरीक्षेचा निकाल ३० जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. यावर्षी २४ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी ५ मे रोजी यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली आणि निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. नीट यूजी परीक्षेत सहा उमेदवार ७२० गुणांसह अव्वल ठरले असून दोन उमेदवारांनी अनुक्रमे ७१८ आणि ७१९ गुण मिळवले.