NEET-UG 2024 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच एनटीएने शुक्रवारी नीट यूजी २०२४ परीक्षेचा सुधारीत निकाल जारी केला. एकूण २३ लाख उमेदवार नीट यूजी २०२४ परीक्षेला बसले होते. सुधारित नीट निकालामुळे त्यांच्या गुणांमध्ये फेरबदल करण्यात आला. नीट- यूजी २०२४ परीक्षेच्या निकालात सुधारणा झाल्यानंतर टॉपर्सची संख्या ६१ वरून १७ वर आली आहे.
नव्या सुधारित निकालानंतर सुमारे ४ लाख उमेदवारांच्या गुणात बदल झाला आहे. भौतिकशास्त्रातील एका अस्पष्ट प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुणवत्ता यादीत बदल करण्याची गरज होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २३ जुलै रोजी सुधारित निकाल दोन दिवसांत जाहीर केले जातील अशी घोषणा केली होती.
नीट यूजी २०२४ सुधारित निकाल जारी झाल्यानंतर लवकरच समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. सुधारित निकाल जारी केल्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समिती नीट यूजी समुपदेशनासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. ही प्रक्रिया संपूर्ण भारतातील एमबीबीएस आणि बीडीएस कार्यक्रमांसाठी प्रवेश निश्चित करते. नोंदणीदरम्यान, उमेदवार निवड-फाइलिंग टप्प्यावर महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांची निवड करू शकतात.
५ मे रोजी भारताबाहेरील १४ शहरांसह देशभरातील ५७१ शहरांमधील ४,७५० विविध केंद्रांवर २४ लाखांहून अधिक उमेदवारांनी नीट- यूजी २०२४ परीक्षा दिली. ५ मे रोजी नियोजित परीक्षेत वेळेचा अपव्यय झालेल्या १५६३ उमेदवारांची २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली.
भौतिकशास्त्राच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सुधारणा करून निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला दिल्यानंतर काही दिवसांनी ही घोषणा करण्यात आली. एनटीएने भौतिकशास्त्राच्या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणून चारपैकी दोन पर्यायांना ग्राह्य धरले होते आणि एनसीईआरटीच्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या आधारे हे पर्याय चिन्हांकित केलेल्या परीक्षार्थींना चार गुण दिले होते.
आता ज्या विद्यार्थ्यांची उत्तरे आयआयटी दिल्लीने दिलेल्या उत्तराशी जुळतात. त्यांनाच या प्रश्नासाठी चार गुण मिळणार आहेत. दरम्यान, एनसीईआरटीच्या जुन्या पाठ्यपुस्तकानुसार अन्य पर्यायांची उत्तरे देणाऱ्या नीट- यूजी च्या चार लाखांहून अधिक उमेदवारांना त्याऐवजी पाच गुण गमवावे लागणार आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती आणि म्हटले होते की, परीक्षेचे पावित्र्य भंग केल्यामुळे परीक्षा खराब झाल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही.
संबंधित बातम्या