नीट यूजी परीक्षेचे पेपर फुटल्याने याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. यामुळे शिक्षण क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले. हा मुद्दा संसदेतही गाजला. दरम्यान, नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या परीक्षेबाबत मोठा निर्णय दिला आहे. नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिला आहे.
पेपरफुटी आणि गैरप्रकारांप्रकरणी वैद्यकीय प्रवेशाची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट)-यूजी २०२४ परीक्षा रद्द करण्यास मंगळवारी नकार दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. वैद्यकीय प्रवेश परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती, तर निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, फेरपरीक्षेचे आदेश दिल्यास २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होईल आणि येत्या काही वर्षांत त्याचा व्यापक परिणाम होईल.
संबंधित बातम्या