Supreme Court on NEET UG Result : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-पदवीधर (NEET- UG) २०२४ च्या परीक्षेतील वाढीव गुणांबाबत सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, सरकारने न्यायालयाला सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत त्यांचे स्कोअरकार्ड रद्द केले जातील. त्यांना २३ जून रोजी पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या १५६३ आहे. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करणाऱ्यांना निर्णयाची वाट पाहण्याचा सल्ला देखील कोर्टाने दीला आहे.
फिजिक्सवाला अलख पांडे यांच्या वकिलाने याचिका दाखल करून ग्रेस गुण देणे योग्य नसल्याचा आरोप केला होता. त्याच्या याचिकेवर न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर ८ जुलै रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुलांचे समुपदेशन सुरूच राहणार आहे. आम्ही ते थांबवणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. आमच्या निर्णयात परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्याचा समावेश असेल, तर समुपदेशनही आपोआप रद्द होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
१२ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने (NTA) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांना पुन्हा हजर राहावे लागणार आहे. १५६३ उमेदवारांना दिलेली सर्व स्कोअर कार्डे रद्द केली जातील. त्यांना फेरपरीक्षेचा पर्याय दिला जाईल.
६ जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी फेरपरीक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती एनटीएने दिली.
नीट परीक्षेच्या आयोजनात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने नोटीस बजावली आणि ८ जुलै रोजी येणाऱ्या याचिकांशी टॅग केले. त्यातील एका याचिकेत फिजिक्सवालाचे सीईओ अलख पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचाही समावेश आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.