NEET Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार NEET UG 2024 परीक्षेचा केंद्र आणि शहरनिहाय निकाल जाहीर केला. पेपरफुटी तसेच गैरव्यवहार या सारख्या अनेक कारणांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा धक्कादायक निकाल लागला आहे. अनेक केंद्रांतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून पुन्हा नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.
सीकर आणि राजकोट परीक्षा केंद्रांवर कोट्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सीकर, राजस्थान येथील प्रत्येक केंद्रातून ७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. येथील काही केंद्रांवर ही संख्या दीडशेवर गेली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालांच्या विश्लेषणानुसार, सीकर येथे ६०० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या मुलांची संख्या देशातील एकूण सरासरीपेक्षा सर्वाधिक आहे. आरवली पब्लिक स्कूल येथील ९४२ उमेदवारांपैकी ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त तर ७ जणांनी ७०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहे.
त्याचप्रमाणे, सीकरमधील मोदी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ११० हून अधिक उमेदवारांनी ६०० हून अधिक गुण मिळवले. तर विश्व भारती पीजी कॉलेज सेंटरमध्ये ७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा गुण मिळवले आहेत. टागोर पीजी कॉलेजमध्येही हीच परिस्थिती आहे. आर्यन पीजी कॉलेज सेंटरमध्ये ६०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या ९० आहे. तर सनराईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८५, बीपीएस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ९४, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३२ आणि श्री मंगल चंद दिवानिया विद्या सेंटरमध्ये ११५ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा जास्त गुण आहेत.
सीकरमधील परीक्षा केंद्रांवर एकूण २७ हजार मुलांनी नीट परीक्षा दिली. त्यातील ४ हजार २०० हून अधिक मुलांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवले. तर संपूर्ण देशातील एकूण ३०,२०४ विद्यार्थ्यांनी ६५० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. देशभरातील एकूण २३.२२ लाख उमेदवारांपैकी हे प्रमाण १.३ टक्के आहे. सीकरमधील इतर दोन केंद्रांवर १५० उमेदवार आणि ८३ उमेदवारांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ही परीक्षा ५ मे रोजी ५७१ शहरांमधील ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली, ज्यामध्ये १४ परदेशी शहरांचाही समावेश होता. या परीक्षेत २४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
आरके युनिव्हर्सिटी, राजकोट, गुजरातच्या युनिट-१ स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या केंद्र क्रमांक २२७०१ येथील मुलांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मुले वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागांसाठी पात्र ठरले आहेत. तर १९६८ विद्यार्थ्यांपैकी १३८७ विद्यार्थी नीटसाठी पात्र ठरले आहेत. एवढेच नाही तर १२ हून अधिक विद्यार्थ्यांनी ७०० आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. ११५ विद्यार्थ्यांनी ६५० गुण, २५९ विद्यार्थ्यांना ६०० गुण, ४०३ विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा जास्त आणि ५९८ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. एका विद्यार्थ्यानेही ७२० गुण मिळवले आहेत.
उमेदवारांची ओळख गुप्त ठेवून निकाल जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाने म्हटले होते की, अनियमिततेमुळे प्रभावित झालेल्या केंद्रांवर परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना इतरत्र परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत का हे शोधावे लागणार आहे.
संबंधित बातम्या