NEET-PG 2024 to be held on August 11: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने नीट पीजी २०२४ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. एसओपी आणि प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर नीट- पीजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने २२ जून रोजी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणाऱ्या नीट- पीजी परीक्षेशी संबंधित अधिक माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर दिली जाईल. ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी अर्ज केला आणि २३ जून रोजी परीक्षा देऊ शकले नाहीत, ते एनबीईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन परीक्षेच्या तारखेची सूचना तपासू शकतात.
परीक्षा रद्द झाल्यानंतर एनबीईचे अध्यक्ष डॉ. अभिजात सेठ म्हणाले होते की, शिक्षण मंत्रालयाला परीक्षा प्रक्रियेची मजबूती तपासून प्रक्रियेत कोणतीही कमकुवतपणा नसल्याची हमी मिळवायची होती. यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एनबीई गेल्या ७ वर्षांपासून नीट- पीजी परीक्षा आयोजित करते. परंतु, आतापर्यंत कधीच पेपर लीक झाल्याचा प्रकार घडला नाही, असे ते म्हणाले.
नीट परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सायबर क्राइम विरोधी संस्थेसोबत बैठक घेतल्याच्या काही दिवसांनंतर नवीन तारखेची घोषणा करण्यात आली. नीट पीजी परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. परीक्षेच्या दोन तास आधी प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरातील सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एमबीबीएस पदवीधारकांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी नीट-पीजी परीक्षा आयोजित केली जाते.
संबंधित बातम्या