NEET PG 2024 Exam Date and Time: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस म्हणजेच एनबीईएमएसद्वारे घेतली जाणारी नीट पीजी २०२४ परीक्षा आज होत आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते १२.३० आणि दुपारी ३.३० ते ७ अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून झालेली एखादी चूक त्यांच्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकते. या परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये जाण्याआधी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नीट पीजी परीक्षा सुरुवातीला २३ जून रोजी होणार होती. परंतु, नीट यूजी वादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून ती पुढे ढकलली. यंदा परीक्षा घेण्यात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आणून देत पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर देशातील स्पर्धा परीक्षांच्या प्रामाणिकतेला आव्हान देण्यात आले होते.
नीट- पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. उमेदवारांना अशी शहरे देण्यात आली आहेत, जिथे पोहोचण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. काही जणांच्या मागणीसाठी पाच विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आपले प्रवेशपत्र अधिकृत एनबीईएमएस वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा संगणक-आधारित चाचणी असेल ज्यात अनिवार्य कालबद्ध विभाग परीक्षा पॅटर्न असेल. ज्यामुळे देशभरातील प्रत्येक विभागासाठी समान वेळ सुनिश्चित होईल.
१) पहिल्या स्लॉटसाठी उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या शिफ्टसाठी उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत आपापल्या केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
२) परीक्षेच्या ठिकाणी मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, टॅब्लेट सह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.
३) उमेदवारांना मेंदी किंवा इतर कोणत्याही रंगाने बोटांवर टॅटू काढण्याची परवानगी नाही.
४) परीक्षा हॉलमध्ये छापील किंवा लिखित, नोट्स, प्लॅस्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेन, रायटिंग पॅड, पेन ड्राइव्ह, इरेजर आणि रफ पेपर असे कोणतेही मजकूर वापरण्यास मनाई आहे.
५) परीक्षा केंद्रावर ब्रेसलेट, अंगठी, झुमके, नाक-पिन, चेन/नेकलेस, पेंडंट, पेंडंटसह नेकलेस, बॅज, ब्रोच असे दागिने घालण्यास मनाई.
६) पाकीट, गॉगल्स, हँडबॅग, बेल्ट, टोपी, हातमोजे यासारख्या कोणत्याही खाण्यायोग्य किंवा इतर वस्तूंना परवानगी नाही. परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक उमेदवाराला पाण्याची बाटली देण्यात येणार आहे.