Neet paper leak : नीट पेपर लीक प्रकरणात तपासाला मोठे यश, CBI ने तलावातून बाहेर काढले ७ मोबाईल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Neet paper leak : नीट पेपर लीक प्रकरणात तपासाला मोठे यश, CBI ने तलावातून बाहेर काढले ७ मोबाईल

Neet paper leak : नीट पेपर लीक प्रकरणात तपासाला मोठे यश, CBI ने तलावातून बाहेर काढले ७ मोबाईल

Jul 27, 2024 02:08 PM IST

Neet paper leak : तलावातून मिळालेल्या मोबाइलच्या माध्यमातूनच लीक झालेले पेपर आणि त्याची उत्तरे परीक्षार्थींपर्यंत पोहोचले होते. आता मोबाइलची फॉरेंसिक तपासणी करून त्याचा डाटा मिळवला जाईल.

 नीट पेपर लीक प्रकरणात तपासाला मोठे यश
नीट पेपर लीक प्रकरणात तपासाला मोठे यश

Neet paper leak case : नीट पेपर लीक प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. हा मुद्दा संसदेतही तापला होता. या प्रकरणाचे कनेक्शन धनबादशी जोडले आहे. सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी धनबादमधील कंबाइन्ड बिल्डिंगमधून पवन कुमार नावाच्या तरुणाला पकडले. पवन आणि अन्य एका तरुणाला घेऊन सीबीआयचे पथक झरिया येथील सुदामडीह पोलीस ठाणे क्षेत्रातील नुनूडीह येथील शहीद गुरुदास चटर्जी फुटबॉल मैदानाच्या जवळ असलेल्या तलावाच्या किनारी पोहोचली. दोघांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळपास ३ तासांच्या प्रयत्नानंतर तलावाच्या पाण्यातून २ आयफोनसह सात हून अधिक मोबाइल बाहेर काढले. सर्व मोबाइल फोन एका सिमेंटच्या पोत्यात भरून तलावात फेकले होते. सर्व फोन तुटलेल्या अवस्थेत मिळाले. सीबीआय पथकाने सुदामडीह आणि पाथरडीह पोलिसांच्या मदतीने सर्व फोन ताब्यात घेतले आहेत.

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तलावातून मिळालेल्या मोबाइलच्या माध्यमातूनच लीक झालेले पेपर आणि त्याची उत्तरे परीक्षार्थींपर्यंत पोहोचले होते. आता मोबाइलची फॉरेंसिक तपासणी करून त्याचा डाटा मिळवला जाईल. पेपर लीक प्रकरणात सीबीआयची कारवाई पाहून आरोपींनी मोबाइल फोन एका पोत्यात भरून ते इन्सुलेटर आणि तारेने घट्ट बांधून तलावात फेकले होते. जेणेकरून ते कोणाच्या हाताला लागू नयेत. पोते उघडल्यानंतर त्यात तुटलेले मोबाइल फोन आणि दोन इन्सुलेटर मिळाले.

छापेमारी पथक आणि पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. सीबीआय टीमने मोबाइल जप्त केल्यानंतर पाण्यात उतरून मोबाईल बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या स्थानिक लोकांना पाच हजाराचे बक्षीस दिले. नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने याआधीही झरियामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. या प्रकरणात एम्स पाटणामधील अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

एनडीआरएफ येण्यास उशीर झाल्याने स्थानिक नागरिक उतरले पाण्यात –

स्थानिक लोकांनी सांगितले की, सीबीआयच्या पथकाने एनडीआरएफ टीमला बोलावले होते. मात्र एनडीआरएफ घटनास्थळी येण्यास विलंब झाल्याने सीबीआयने स्थानिक लोकांना तलावात जाण्यास सांगितले. त्याचबरोबर पथक त्यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणांची चौकसी करत होते. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तलावात शोध घेतला गेला. तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर तलावातून ७ हून अधिक मोबाइल फोन बाहेर काढले गेले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर