NDA government ministers portfolios : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास २४ तासानंतर खातेवाटप (Council of Ministers) झाले आहे. पंतप्रधान मोदींनी गृहमंत्रालय अमित शहांकडे सोपवले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते व परिवहन मंत्रालय तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्य मंत्री असतील.
LJP (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा मंत्रालय सोपवण्यात आले आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे दोन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते घरकूल तसेच ऊर्जा मंत्रालय सांभाळतील. श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. तोखम साहू यांच्याकडे घरकूल राज्यमंत्र्याची जबाबदारी असेल.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सोपवले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. मोदी सरकार २.० मध्ये रेल्वे मंत्रालय सांभाळणाऱ्या अश्विनी वैष्णव यांना माहिती व प्रसारण मंत्रालय दिले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि HAM पार्टीचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिले आहे. शोभा करंदलाजे यांना या विभागाचे राज्यमंत्री बनवले आहे. निर्मला सीतारामण यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे.
रविवारी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार मंत्री आणि ३६ राज्य मंत्री आहेत.
संबंधित बातम्या