NDA Cabinet : प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, तटकरेंचा पत्ता कट; उद्या घेणार शपथ!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NDA Cabinet : प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, तटकरेंचा पत्ता कट; उद्या घेणार शपथ!

NDA Cabinet : प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, तटकरेंचा पत्ता कट; उद्या घेणार शपथ!

Jun 08, 2024 04:27 PM IST

Praful Patel : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एका नेत्याची वर्णी लागली आहे. अजित पवार गटातील नेते प्रफुल पटेल उद्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

 प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी
 प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी

 

Praful patel will take cabinet minister oath : नरेंद्र मोदी उद्या (रविवार, ९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्यासोबत एनडीएमधील अन्य खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असून महाराष्ट्रातून एकाचे मंत्रिपद पक्के झाल्याचे मानले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असून यामुळे सुनिल तटकरेंचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.

रविवारी  संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) तील काही घटक पक्षातील खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील काही खासदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिल्या खासदाराचे नाव निश्चित झाले झाले. अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे करण्यात आले. प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यात झालेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रि‍पदासाठी निवड करण्यात आली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात पटेल उद्या शपथ घेतील. त्यांना कोणते खाते मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधी प्रफुल पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच मनमोहन सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरच शिवसेना शिंदे गटाकडूनही एकाला मंत्रिपद मिळू शकते. शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आदी नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर भाजपकडून नितीन गडकरी यांच्याबरोबरच नारायण राणे, रक्षा खडसे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी केंद्रात कुणाची वर्णी लागणार? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

मोदी ३.० सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी घटक पक्षातील प्रत्येक चार खासदारांमागे एक मंत्रिपद असे सूत्र निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वाधिक व महत्वाची मंत्रिपदे भाजपकडे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय ही खाती भाजप स्वत:कडे ठेऊ शकते. टीडीपी व जनता दल सेक्युलरला कोणती खाती मिळतात हे पाहणे महत्वाचे आहे. रेल्वे खात्याबाबतही अनेक घटक पक्ष आग्रही आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला कोणते खाते येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर