मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचं नाव चर्चेत, भाजपच्या निर्णयाकडं लक्ष

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचं नाव चर्चेत, भाजपच्या निर्णयाकडं लक्ष

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 13, 2022 01:36 PM IST

राष्ट्रपती पदाच्या (President) उमेदवारीसाठी आता बिगर भाजप पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाला पसंती देत आहेत. अशात भाजप (BJP) पवारांच्या नावाला सहमती देते का? हा एक मोठा प्रश्न आहे.

शरद पवार
शरद पवार (हिंदुस्तान टाइम्स)

देशाचं सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती पद (President). याच राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी पार पडणार आहे. त्या निवडणुकासाठी संभाव्य उमेदवार चाचपणी भाजप (BJP) आणि बिगर भाजप पक्ष या दोहोंकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार हे देशाचे अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांनी केंद्रातही महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्यामुळे सहाजिकच शरद पवार यांच्या नावाला पाठींबा मिळणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवल्यास आम आदमी पक्षाने त्यांच्या नावाला पाठींबा असेल असं अधिकृपणे जाहीर केलंय. आगामी काही दिवसात दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजप शासीत राज्यांच्या नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातल्या २२ नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्या बैठकीत शरद पवार यांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ठेवलं जाणार असल्याच्या शक्यतेलाही वेग आला आहे.

इथे महाराष्ट्रातही शरद पवार यांच्या नावाला पाठींबा मिळताना पाहायला मिळतोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शर पवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहाणार असतील तर प्रदेश काँग्रेस त्यांना पाठींबा देणार असल्याचं नाना पटोले म्हणालेत.

सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार खरगे हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीनंतर राष्ट्रपती निवडणुकीबाबत आम्ही प्राथमिक चर्चा केली, असे खरगे आणि पवार यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. आगामी १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि २१ जुलैला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. 

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची नकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. आपचे खासदार संजय सिंह आणि शरद पवार यांच्यात याविषयी चर्चाही झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल.

ही झाली नाण्याची एक बाजू. मात्र दुसरीकडे लोकसभेत सर्वाधिक खासदार असणाऱ्या भाजपच्या निर्णयावरही बरंच काही अवलंबून असणार आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात कभी हां कभी ना असे राजकीय प्रसंग पाहायला मिळतात. अशात सर्वाधिक ३०१ खासदार संख्या असलेल्या भाजपला विश्वासात घेणं हे सर्वात मोठं काम जर शरद पवार उभे राहाणार असतील तर त्यांना करावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी त्यांना नरेंद्र मोदी यांना विश्वासात घ्यावं लागेल. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि नरेंद्र मोदींचा एक विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यसभा निवडणूक नियोजनाचं कौतुक केलं होतं. ही मोदींच्या जवळ जाण्याची एक पायरी तर नाही अशीही शक्यता जाणकार नोंदवत आहेत. 

WhatsApp channel