बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना मोदींच्या डिग्रीचं काय घेऊन बसलात?, शरद पवारांचा विरोधकांना टोला
Sharad Pawar : अदानी प्रकरणानंतर आता पीएम मोदी यांच्या डिग्रीवरही भाष्य करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपची पाठराखण केली आहे.
Sharad Pawar On Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एमएच्या डिग्रीवरून देशभरात राजकीय वादंग पेटलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा उचलत भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे आरोप परतावून लावत पीएम नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. सध्या देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना डिग्रीचं काय घेऊन बसलात?, असा सवाल करत शरद पवार यांनी विरोधकांना खडसावलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आपल्या देशात सर्वांपुढे केवळ मोदींच्या डिग्रीचा प्रश्न आहे का?, इतरांची डिग्री चेक करणं हे जास्त महत्त्वाचं आहे का?, बेरोजगारी, महागाई आणि कायदा व सुव्यस्थेच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारनं काम करायला हवं. त्यामुळं देशात मोठी बेरोजगारी असताना तुम्ही मोदींच्या डिग्रीचं काय घेऊन बसलात?, असा सवाल करत शरद पवार यांनी विरोधकांनाच टार्गेट केलं आहे. त्यामुळं आता शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मोदींकडे डिग्री असेल तर ती त्यांनी दाखवायला हवी, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पवारांच्या वक्तव्यामुळं ठाकरे गटाची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे.
मोदींनी डिग्रीच्या जोरावर बहुमत मिळवलं का?- अजित पवार
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली केंद्रात बहुमत मिळवलं ते काय डिग्रीच्या जोरावर मिळवलं होतं का?, काश्मिर ते कन्याकुमारी असा प्रवास करत त्यांनी स्वत:चा करिष्मा निर्माण केला. त्यामुळं भाजपच्या विजयाचं श्रेय फक्त मोदींनाच जातं. त्यामुळं त्यांच्या डिग्रीचा विषय फार महत्त्वाचा नाहीये. पंतप्रधानांना बहुमताच्या आधारावरच निवडलं जातं, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.