मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिलेला तुरुंगात टाकणं हा नामर्दपणा; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महिलेला तुरुंगात टाकणं हा नामर्दपणा; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 11, 2022 02:55 PM IST

जामीन देताना मीडियाशी न बोलण्याची व संयमानं वागण्याची अट घालूनही खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत आहेत.

रवी राणा - नवनीत राणा
रवी राणा - नवनीत राणा

सरकारी कामकाजात अडथळा व राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली तब्बल १२ दिवस कोठडीत राहून जामिनावर सुटलेले आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य करणं सुरूच ठेवलं आहे. राणा दाम्पत्यानं आज पुन्हा एकदा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ठाकरे सरकार हे महाराष्ट्रावरचं संकट असून ते दूर होण्यासाठी १४ मे रोजी संकटमोचन हनुमानाची आरती करणार आहोत, अशी घोषणा या दाम्पत्यानं आज केली.

राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली झालेली कारवाई, मुंबई महापालिकेनं बजावलेली नोटीस, लीलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेनं केलेली पोलीस तक्रार या सर्व विषयांवर पुन्हा एकदा बोलताना राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. ‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली आहे. ते हिटलरप्रमाणे वागत आहेत. नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून आले आणि त्यांनी भाजपलाच दगा दिला. उद्धव ठाकरे हे स्वत:ला आणि शिवसैनिकांना मर्द म्हणून घेत असतात. पण त्यांनी एका महिलेला तुरुंगात टाकलं. महिलेला तुरुंगात टाकणं ही मर्दानगी नसते, नामर्दपणा असतो,’ असं रवी राणा म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सभेला महाआरतीनं उत्तर 

येत्या १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसीच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभेला उत्तर म्हणून राणा दाम्पत्य दिल्लीतील एका हनुमान मंदिरात सकाळी ९ वाजता महाआरती करणार आहेत. महाराष्ट्रातील संकट दूर व्हावं, अशी मागणी यावेळी केली जाईल, असं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं.

मुंबईत माझा एकच फ्लॅट, पण…

खार येथील घरात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. त्यावर रवी राणा यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 'मुंबईत माझा एकच फ्लॅट आहेत. पण अनिल परब आणि संजय राऊत यांचे अनेक फ्लॅट आहेत. केवळ त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना शिवसेनेनं आमिष दाखवलं आहे. त्यामुळं ते आमच्याविरोधात कारवाई करत आहेत, असा आरोपही रवी राणा यांनी केला.

IPL_Entry_Point

विभाग